पुद्दुचेरी : पुद्दुचेरीतील काँग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे येथील सरकार अडचणीत आले आहे. विधानसभेत बहुमत चाचणीच्या आधीच काँग्रेस आमदारांनी सभात्याग केला त्यामुळे सरकार फ्लोर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करु शकले नाही.
याअगोदर चार आमदारांनी राजीनामा दिला त्यानंतर आमदार लक्ष्मीनारायण यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे ही संख्या पाचवर पोहोचली होती. त्याचबरोबर सहयोगी पक्ष डीएमकेच्या आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे सरकार अल्पमतात आले होतं. पुद्दुचेरी विधासभेत ३३ सदस्य आहे. यात पाच आमदारांनी राजीनाम्यांमुळं सत्ताधारी काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ही ११ वर आली आहे. सत्तास्थापनेसाठी १७ सदस्यांची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडील आमदारांची संख्या १४ झाली आहे.
दरम्यान, या सर्व घडमोडीवर मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांनी नायब राज्यपालांकडे राजीनामा सादर केला आहे. तसेच, माजी उपराज्यपाल किरण बेदी आणि केंद्र सरकारने मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नारायण सामी यांनी केला आहे. केंद्र सरकारने आम्हाला फंड न देता पुद्दुचेरीतील जनतेला धोका दिल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसने बहुमत सिद्ध न केल्यामुळे पुद्दुचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे. येथे पुढच्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.