नाशिक – महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर कैलास जाधव यांनी मिशन मोडवर काम करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच त्यांनी तातडीने ठक्कर डोम येथील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी प्रशांत शेटे, ठक्कर डोम कोरना कोविड कक्षाचे प्रमुख डॉ. राजेंद्र भंडारी आदी उपस्थित होते. यावेळी या सेंटर मधील रुग्णांची संख्या, त्यांना दिल्या जात असणाऱ्या सुविधा, रुग्णांच्या जेवण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, गरम पाणी आदींबाबत सविस्तर माहिती आयुक्तांना देण्यात आली. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना केल्या.
कर्मचाऱ्यांशी संवाद
आयुक्त जाधव यांचे मनपा मुख्यालयात आगमन होताच प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मनपातील सर्व विभाग प्रमुख यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी आयुक्त जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व विभागप्रमुखांनी परिचय करून दिला. यावेळी आयुक्तांनी सर्वांशी संवाद साधला. सर्वांच्या सहकार्याने शहराच्या विकासाला गती दिली जाईल. आरोग्य विषयावर भर दिला जाईल. स्वच्छतेबाबत दक्षता घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. तर, सध्या सुरू असलेल्या विविध योजना प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे. तत्कालीन आयुक्त गमे यांच्या कार्यकाळातील सर्व कामांचा आढावा घेतला जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.