नाशिक – केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून शहरातील १७ हजाराहून अधिक पथविक्रेत्यांना त्याचा लाभ होणार आहे. या योजनेनुसार, प्रत्येक पथविक्रेत्याला १० हजार रुपयेचे एका वर्षासाठी बँकेमार्फत विनातारण कर्ज उपलब्ध होणार आहे. नियमित कर्ज परतफेड केल्यास ७% व्याज अनुदान व डिजिटल व्यवहार केल्यास कॅश बॅक मिळेल. मुदतीत कर्ज फेड केल्यास बँकेकडून दुस-यांदा २० हजारचे कर्ज उपलब्ध होईल.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची (PM SVANidhi) अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला १७ हजार ८४० पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट दिले आहे. महापालिकेने एकूण ९ हजार ६२० पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण केले आहे. त्यांची नोंद केंद्र सरकारच्या वेबसाईटवर केली आहे. या पथविक्रेत्यांचे मनपाच्या २१ सुविधा केंद्र व इतर खाजगी ग्राहक सेवा केंद्र, आपले सरकार केंद्राद्वारे कर्जाचे ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत.
ज्या पथविक्रेत्यांचे सर्व्हेक्षण यादीमध्ये नाव नाही. त्यांच्यासाठी मनपाचे ऑनलाईन शिफारस पत्र घेण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करून शिफारस पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आज पर्यंत एकूण १२०५ पथविक्रेत्यांनी कर्जाचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहेत. त्यापैकी १९५ पथविक्रेत्यांना बँकांनी कर्ज मंजूर केले आहे. मनपाच्या शिफारस पत्रासाठी ७१८ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. ५१३ पथविक्रेत्यांना मनपाने शिफारस पत्र देण्यात आले आहे. शिफारस पत्र प्राप्त पथविक्रेत्यांना कर्जाचे ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व पथविक्रेत्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी विभागीय अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन सर्व पथविक्रेत्यांना मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.