नवीन नाशिक : नवीन नाशिक विभागातील मनपा पाणी पुरवठा आधिकारी कर्मचा-यांनी पाथर्डी फाट्यावरील जलकुंभावर मद्याची पार्टी करीत धिंगाणा घातल्याचा प्रकार लक्षात येताच त्यासाठी वृत्तांकन करीत असलेल्या पत्रकारास मारहाण केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित मनपा अधिकारी व कर्मचा-यांना अटक करण्यात आली आहे.
दै. देशदूतचे पत्रकार निशिकांत पाटील हे बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्या कडून आपल्या घरी अंबड येथे जात असताना ताज हॉटेल मागील अंबड चौफुली जवळ असलेले मनपा जलकुंभाच्या आवारात मनपा कर्मचारी शैलेश झिटे, ललित भावसार व दोन सहकारी हे आपापसात मद्यपान करून धिंगाणा घालत होते.
आरडा ओरडा करत गोंधळ घालत आसल्याने काही वाहन धारक थांबून पहात असल्याचे दिसले असता निशिकांत पाटील यांनी नक्की कशामुळे आरडाओरडा होत आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. निशिकांत पाटील यांनी तत्काळ वृत्तांकनासाठी फोटो काढले. फोटो काढल्याचा राग आल्याने मनपा अधिकारी झिटे, भावसार व सहकाऱ्यांनी लै मोठा पत्रकार झालास काय ? असा मद्याच्या नशेत जाब विचारून मारहाण केली पाटील यांनी कशीबशी सोडवणूक करीत अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंबड पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून मारहाण करणाऱ्या मद्यपी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस उपायुक्त अशोक नखाते व अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.