पुणे – पत्रकार पांडुरंग रायकर (वय ४२) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वेळेवर ऑक्सिजन अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख तर सरकार आणि प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रायकर हे टीव्ही ९ या वृत्त वाहिनीचे पुणे प्रतिनिधी होते.
अत्यंत संयमी, हुशार आणि प्रभावी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी हैदराबाद येथे ई टीव्ही मध्येही जबाबदारी सांभाळली होती. काही वर्षे ते मुंबईतही होते. अहमदनगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग यांचा जनसंपर्क अतिशय दांडगा होता. अहमदनगर येथेही त्यांनी वृत्तवाहिनीसाठी काम केले. काही वर्षांपासून ते पुण्यात कार्यरत होते. त्यांना श्वसनास त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन अॅम्ब्युलन्सची शोधाशोध सुरू झाली. मात्र, अॅम्ब्युलन्स वेळेवर मिळाली नाही. त्यातच त्यांची ऑक्सिजन पातळी अधिक खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पत्रकारितेसह सर्व स्तरातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, वेळेवर अॅम्ब्युलन्स मिळाली नसल्याने सरकारवर तीव्र टीका केली जात आहे. पांडुरंग यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
दरम्यान, अॅम्ब्युलन्स का मिळाली नाही, याची चौकशी करण्याचे आदेश आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिले आहेत. तर, याप्रकरणी पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायकर यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रीया देण्याची तसदीही न घेतल्याने सर्वत्र नाराजीचे वातावरण आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
वेळेत कार्डियक अँम्ब्युलन्स न मिळाल्या मूळे एका कोरोनाग्रस्त तरुण पत्रकाराचा दुर्दैवी मृत्यू हा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अतिशय वेदना देणाऱ्या असून, हा मृत्यू ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच झाला आहे त्यामुळे ठाकरे सरकारविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी केली.
आर्थिक मदतीची घोषणा
भाजपच्यावतीने रायकर यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टमधून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे.