नाशिक – पती-पत्नीतील भांडणात मध्यस्थी करणाऱ्या समुपदेशन केंद्रातही लाचखोरीने शिरकाव केला आहे. नाशिकच्या महिला समुपदेशन केंद्रातीस समुपदेशकासह एका खासगी व्यक्तीवर १० हजाराची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दिलेल्या माहितीनुसार, एका दाम्पत्यामध्ये मोठ्या प्रमाणाच वाद सुरू होते. अखेर याप्रकरणी या दाम्पत्याला नाशिक महिला समुपदेशन केंद्रात बोलविण्यात आले. तेथे मध्यस्थी करण्यात आली. आणि समझोता घडवून आणण्यात आला. मात्र, काही दिवसानंतर पत्नीने पुन्हा तक्रार केली. या तक्रारीप्रकरणी कुठलीही कारवाई न करण्यासाठी समुपदेशक शिला नामदेव सूर्यवंशी यांनी त्या महिलेच्या पतीकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. विशेष म्हणजे, लाचेची रक्कम ही हिरा सुभाष शिरके या व्यक्तीकडे देण्याचे शिला सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यानंतर पतीने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्याची दखल घेत एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्विकारताना शिरके हा रंगेहाथ पकडले गेला. त्यामुळे शिला सूर्यवंशी आणि हिरा शिरके यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा असून असा प्रकार घडत असल्यास तातडीने एसीबीच्या १०६४ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.