दिंडोरी – घरगुती वादातून रागाच्या भरात विहिरीत उडी घेतलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या पतीसह पत्नी पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना दिंडोरीत घडली आहे. काळू उखा पवार (वय ४२) व निर्मला काळू पवार (वय ३५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.
दिंडोरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळू उखा पवार व निर्मला काळू पवार हे मोलमजुरी करणारे दाम्पत्य इंदिरानगर (मूळ रा. पळसविहिर) येथे राहत होते. गुरुवारी सकाळी दोघांमध्ये घरगुती वाद झाले. त्यानंतर निर्मला ही घराबाहेर निघून गेली. सायंकाळी तिचा शोध घेण्यासाठी काळू हे घराबाहेर पडले. उमराळे रोडवरील मुरकुटे यांचे विहिरीजवळ ती आढळून आली. नवऱ्याला बघताच तिने विहिरीत उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी काळू नेही विहिरीत उडी घेतली. मात्र तिला वाचवित असताना दोघेही विहिरीत पाण्यात बुडाले. ही माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. शोधकार्य सुरू केले मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी दोघांच्याही मृतदेहांचा शोध लागला. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंडोरी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर आव्हाड, नंदू वाघ आदी करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.