नाशिक – पती दुबईत व पत्नी नाशिकमध्ये असतांना कौटुंबिक न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेत घटस्फोट मंजुर केला. लॅाकडाऊनमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने त्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावरही झाला. अशात नाशिक येथील कौटुंबिक न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेऊन हा निर्णय दिला. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शिल्पा तोडकर यांच्या कोर्टात ही सुनावणी सोमवारी झाली. आपसमजूतीने हा घटस्फोट होता. पती याने दुबईतून नाशिक येथील कौटुंबिक न्यायालयात जबाब नोंदवला.
घटस्फोट घेणारे पती, पत्नी दोघेही २०१८ मध्ये नाशिकमध्येच राहत होते. त्यांचा विवाहही येथेच झाला. विवाहानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर वाद कौटुंबिक न्यायालयात गेला. या ठिकाणी दोन्ही पक्षांचे वकील व न्यायालयाने समुपदेशन करुन सदर प्रकरण मिटवले. त्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुध्द केलेल्या सर्व केसेस मागे घेतल्या. पत्नीने गंगापूर पोलिस स्थानकात पतीविरुध्द फौजदारी केस दाखल केली होती. ती देखील उच्च न्यायालयाने व्हिडिओ कॅान्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेऊन रद्दबातल केली.
याअगोदर फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांनी कौटुंबिक न्यायालय येथे आपसमजुतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला व प्रकरण दाखल केले. पण, मार्च २०२० मध्ये पती दुबईत कामानिमित्त गेला. त्यामुळे न्यायालयाने व्हिडिओ कॅान्फरन्सिंगचा वापर करत हा निर्णय दिला. सदर प्रकरणाचे कामकाज व समुपदेशन अॅड. दीपक पाटोदकर व अॅड. श्रीकांत मुंदडा यांनी बघितले.