मुंबई – नवऱ्याची नोकरी अनेक महिलांना त्रासदायकच वाटत असते. आपला पती अनेक तास कोरोना ड्युटीवर राहत असल्याने एका माहिलेने थेट कोर्टातच धाव घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पुणे येथील एक महिला मायक्रोबायलॉजीची प्रोफेसर असून त्यांचे पती एका रुग्णालयात डॉक्टर आहेत. सध्या ते कोव्हीड रुग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. मात्र आपले पती कोव्हीड रुग्णांच्या सेवेसाठी अनेक तास ड्युटीवर राहत असल्याने आपल्याला आणि कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही, असे या महिलेने कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले.
सदर महिला आणि त्या डॉक्टरच्या विवाहाला दोन वर्षांचा कालावधी झाला असून पुर्वी दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मात्र आता कोविड -१९ दरम्यानच्या काळातील नोकरीच्या जास्त कामकाजामुळे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर विपरित परिणाम होत आहे. मार्च महिन्यात या डॉक्टरांची ड्यूटीची वेळ सुमारे १८ तास होती, त्यानंतर एप्रिलमध्ये ही तीच परिस्थिती होती. पुढे देखील ड्युटीमध्ये वाढ होतच राहिली. त्यामुळे सदर महिलेने न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली.
या प्रकरणी न्यायालयाने संबंधितांना त्यांचे समुपदेशन करण्याची सूचना केली. त्यानुसार समुपदेशन झाले. या प्रकरणातील ऑनलाईन सुनावणीच्या वेळी सदर महिलेने फिर्याद मागे घेऊन एफआयआर रद्द करावे, असे न्यायालयाने सांगितले. तर, पतीला सांगितले की, आपले खासगी आयुष्य आणि नोकरी यात अंतर ठेवा, तसेच कुटुंबातील लोकांची देखभाल करा. शिवाय न्यायालयाने महिलेला सांगितले की, आपले डॉक्टर पती हे कोरोनाच्या संकटकाळात दिवस-रात्र सेवा करत असल्याने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सहकार्य असल्याने अखेर न्यायालयांनी एफआयआर रद्द केले.