नाशिक – पतीच्या निधनानंतर संघर्ष करून जगणाऱ्या आणि मेहनतीच्या जोरावर पोटच्या पोरांना वाढविणाऱ्या महिलांची उदाहरणे कमी नाहीत. स्त्री संघर्षातून घडत जाते आणि एक आदर्श समाजापुढे उभा करीत असते. असेच एक उदाहरण नाशिकमध्ये बघायला मिळत आहे. सविता लभडे या महिलेने पतीच्या अकाली निधनानंतर शेतात राबून मुलांना तर वाढवलेच शिवाय पतीचे सात लाख रुपयांचे कर्जही फेडले.
वसुली आले म्हणून कळले
२००८ साली सविताच्या पतीचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दोन मुलांना सांभाळून कुटुंबाचा गाडा ओढण्याचे मोठे आव्हान सवितापुढे उभे झाले. पण त्याहीपेक्षा मोठे आव्हान होते ते म्हणजे पतीने घेऊन ठेवलेले ७ लाख रुपयांचे कर्ज फेडण्याचे. नाशिक शहरातील आडगाव येथे राहणाऱ्या सविता मुळात पतीच्या या कर्जाबद्दल अनभिज्ञ होती. ज्या दिवशी सहकारी बँक कर्जाच्या वसुलीसाठी दारावर आली त्याच दिवशी तिला याबाबत माहिती झाली.
अनुभव नसताना शेती
पतीच्या निधनानंतर तब्बल एक वर्षांनंतर तिला याबाबत कळले. तोपर्यंत कर्जावरील व्याजही चांगलेच वाढलेले होते. पण त्यावेळी तिच्याकडे कर्ज फेडण्यासाठी केवळ सोन्याची चैन होती. चैन विकूनही ती फारच कमी रक्कम फेडू शकली. सविताकडे अडीच एकराची द्राक्षाची बाग होती. त्यातून वर्षातून एकदाच उत्पन्न येणे शक्य होते. त्यातही द्राक्षाची बाग सांभाळण्याचा कुठलाही अनुभव तिच्याकडे नव्हता. त्यामुळे याच जागेत तिने भाजीपाला घ्यायचा निर्णय घेतला. पण यातून येणारे उत्पन्न स्थिर नव्हते. भाज्या विकून महिन्याला फार तर दहा हजार रुपये येऊ लागले. मुलगा इयत्ता चौथीत आणि मुलगी दुसरीत असल्याने त्यांचे शिक्षण, दैनंदिन खर्च व कर्जाचे हफ्ते फेडणे केवळ अशक्य होते.
दागिने विकून घेतले मशीन
अशात सविताला मसाला तयार करण्याच्या यंत्राबाबत माहिती मिळाली. एका मैत्रीणीने तिला याबाबत सांगितले. तिने आणखी काही दागिने विकले आणि काही सेव्हींग्स मोडल्या. त्यातून ६५ हजार रुपयांचे यंत्र खरेदी केले. हा व्यवसाय तिला महिन्याला ५० हजार रुपये उत्पन्न देऊ लागला. त्याचवेळी भाजीपाल्यासोबत तिने शेतात सोयाबीन आणि गव्हाचे पीक घ्यायला सुरुवात केली.
सहा वर्षांनी फेडले कर्ज
सहा वर्षे कष्ट केल्यानंतर २०१४ मध्ये सविताने सात लाख रुपयांचे संपूर्ण कर्ज फेडले. २०१५ पर्यंत सविताला महिन्याला ६० हजार रुपये स्थिर उत्पन्न मिळायला लागले. मसाल्याचा व्यवसाय फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत चालतो. या कालावधीत मसाले मार्केटमध्ये येतात आणि वर्षभर राहतात. मसाल्याचा व्यवसाय आणि शेतीतून येणारे उत्पन्न असे एकूण १ लाख रुपये महिना आता सविताला मिळत आहे. यातून मुलांचे शिक्षण तर उत्तम चालत आहेच, शिवाय पैशांची चणचणही पूर्णपणे दूर झाली आहे.
दुकानही थाटले
ऊसाची शेती करण्याचे धाडसही तिने केले आणि त्यातही यश मिळविले. यातूनही ५४ हजार रुपये मोसमाला मिळत आहेत. मुलीच्या नावाने तिने २०१९ ला साधना जनरल स्टोअर सुरू केले. मसाल्याच्या व्यवसायात होणारा तोटा दुकानाच्या माध्यमातून भरून निघतो, असे ती म्हणते. मुले आणि सासू-सासऱ्यांना एक सुखी जीवन देण्याचा मार्ग तिला सापडला आहे.
आठवी पास तरीही
सविता केवळ आठव्या वर्गापर्यंत शिकली आहे. त्यामुळे व्यवसायाचे कौशल्य शिकायला तिला थोडा वेळ लागला. मात्र कष्टाने सारे काही सोपे केले. मसाल्याच्या व्यवसायात तर पहाटे पाचपासून रात्रीपर्यंत राबावे लागते. तिने तेही केले. तेव्हाच नफ्याचा व्यवसाय शक्य झाला.