मनाली देवरे, नाशिक
….
मुंबई इंडियन्स जिंकणार की दिल्ली कॅपीटल्स ? हा प्रश्न १० तारखेला संध्याकाळी आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्याचा अंतिम निकाल येईपावेतो अनेक वेळेला विचारला जाईल. हा प्रश्न वाटतो तितका साधा, सरळ आणि सोपा नाही. आयपीएलचा विजेता कोण असेल याचे भाकीत करणे यंदा कठीण झाले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. नेहमीप्रमाणे ८ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा असे काही घडले की, टॉप ४ संघ कोणते असतील हे स्पष्ट व्हायला साखळीतल्या शेवटच्या सामन्यापर्यन्त वाट बघावी लागली. कसे बसे ४ संघ मिळाले परंतु जेव्हा त्यांच्यात प्ले ऑफची लढाई झाली त्यावेळेला तिसरा आणि चवथा संघ पुन्हा बाहेर पडला आणि जे दोन संघ पहिल्या आणि दुस–या स्थानावर होते तेच संघ अंतिम सामन्यात पोहोचले. खरेतर या प्रवासाच्या नियमानुसार सर्वप्रथम प्ले ऑफ मध्ये पोहोचलेला आणि पहिल्या क्रमांकावर राहीलेला मुंबई इंडीयन्स हाच संघ निश्चीतपणे २०२० मधल्या आयपीएलच्या १३ व्या सिझनचा विजेता ठरायला हवा, पण ……. ! हा पण शब्द इथे फार महत्वाचा आहे.
या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा झाल्यास या दोन्ही संघाची कामगिरी त्यासाठी सर्वप्रथम तपासून पहावी लागेल म्हणजे आपल्याला कुठेतरी एका संभाव्य विजेत्या संघावर आपले मत नोंदविता येईल. साखळीत काय झालं ? दोन्ही संघाचे एकमेकांविरूध्द २ सामने झाले. पहिला सामना मुबंईने ५ गडी राखून तर दुसरा सामनाही मुंबईनेच ९ गडी राखून जिंकला. या दोन्ही विजयाची आणखी एक महत्वाची आकडेवारी आहे म्हणजे, दिल्ली कॅपीटल्स या सिझनमध्ये फक्त एकाच संघाकडून दोनदा पराभूत झाले आणि तो संघ म्हणजे अर्थातच, मुंबई इंडीयन्स. साखळी फेरीच्या बाहेर आल्यावर दोन्ही संघात आणखी एक सामना झाला. तो देखील मुंबई इंडीयन्सनेच ५७ धावांनी जिंकला. म्हणजे. अवघ्या २५ दिवसाच्या कालावधीत या दोन संघात जे काही ३ सामने खेळले गेले ते तीनही सामने मुंबई इंडीयन्सने जिंकून दिल्ली कॅपीटल्सवर आले निर्वीवाद वर्चस्व शाबीत केले आहे. इथे देखील, या नमुद केलेल्या कामगिरीच्या प्रवासाच्या आकडेवारीनुसर चवथ्या सामन्यात मुंबई इंडीयन्स हाच संघ निश्चीतपणे विजेता ठरायला हवा, पण ……. ! हा पण शब्द इथेही फार महत्वाचा आहे.
आता आणखी एक महत्वाची बाब. अंतिम सामना दुबईत होतो आहे. दुबईचे ग्रांउड भले मोठे असून त्याच्या सिमारेषांचे अंतर ब–यापैकी लांब आहे. आता किक्रेटमध्ये जय–पराजयाचे आराखडे बांधतांना कोणत्या मैदानावर सामना खेळवला जातो आहे ? हे किक्रेट जाणकारास सांगणे न लगे. दुबईत या सिझनमध्ये दिल्लीला ८ सामने खेळण्याची संधी मिळाली तर मुंबईला माञ अवघे ४ सामने या सञात खेळण्याची संधी मिळाली आहे. निश्चीतच, हे मैदान, इथल्या खेळपट्टीचा स्वभाव, इथले हवामान याच्याशी दिल्ली संघ जितका एकरूप झाला असेल तितकी संधी मुंबईला मिळालेली नाहीच. परंतु, इथल्या कहानीत देखील थोडासा ट्वीस्ट आहे आणि तो म्हणजे या मैदानावर मुंबईने दिल्ली कॅपीटल्सला २ सामन्यात धोबीपछाड दिली असून अंतिम सामन्यात खेळतांना या विजयाचा धाक मुंबईच्या बाजुला राहील. आता मुंबईसाठी उर्वरीत दोन सामन्यात काय झालं आहे ते ही माहिती करून घ्या. मुंबई संघ उर्वरीत २ सामन्यात दुबईच्या मैदानावर पराभूत झाला आहे, पण हे दोन्ही सामने सुपर ओव्हर पर्यन्त पोहोचले होते आणि मग या सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन आणि आरसीबीने मुंबईवर मात केली हे विसरून चालणार नाही. आता इथे देखील, दुबईच्या मैदानावर दोन्ही संघाच्या कामगिरीच्या कामगिरीचा लेखाजोखा तपासून बघितला तर मुंबई इंडीयन्सचेच पारडे जड ठरते आहे असे दिसेल पण ……. ! हा पण शब्द इथेही फार महत्वाचा आहे.
मुंबईच्या बाजुने सारं काही आलबेल आहे. जिंकण्याची संधी त्यांनाच आहे. पण मग म्हणून काही दिल्ली कॅपीटल्सला कमी लेखून थोडेच चालणार आहे. सनरायझर्सने देखील त्यांना दोन्ही साखळी सामन्यात पराभूत केले होतेच, परंतु जेव्हा “करो वा मरो” अशी स्थिती निर्माण झाली तेव्हा जिंकले ते दिल्ली कॅपीटल्स. हा अनुभव नजरेआड करून कसा चालेल. क्रिकेटमध्ये कधी कधी सामन्याचा दिवस कोणत्या संघाचा आहे यानुसार देखील निकाल बघायला मिळतात हा आत्तापर्यन्तचा अनुभव आहे. खासकरून एखादया स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तर जिंकण्याचाच दबाव असल्याने भल्या भल्या संघाची वाट लागते हे भारतीय क्रिकेट संघाने १९८३ च्या विश्वचषकात देखील शाबीत केले आहे. त्यामुळे कदाचित मंगळवारचा दिवस दिल्ली कॅपीटल्सचा असला तर..ॽ. असु शकतो. ‘वक्त बदलते देर नही लगती’ हे ध्यानात ठेवून प्रत्येकाला ही फायनल मॅच कदाचित शेवटल्या चेंडू पर्यंत मन लावून बघावी लागेल. हा ‘पण’ शब्द महत्वाचा आहे तो याचसाठी.