नवी दिल्ली/कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणाच व्हायची आहे, मात्र राजकीय भूकंपाचे धक्का बसायला लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करु लागले आहेत. त्यामुळे विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची ज्येष्ठ पक्ष नेत्यांची मनधरणी करताना दमछाक होत आहे. तृणमूलमधील नेते आपली साथ का सोडत आहेत, या प्रश्नाचे उत्तर ममता दीदींना सापडलेले नाही.
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. पक्षाच्या स्थापना दिनाला म्हणजेच १ जानेवारीला तब्बल १५ माजी नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले. आणि आता लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्रीपदासह पक्षाच्या सर्वच पदांचा राजीनामा दिलेला आहे. अर्थात ते आमदार म्हणून कायम राहणार. त्यांचा राजीनामा ममतांनी स्विकारला आहे. शुक्ला हे राजकारण सोडून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात परत जाऊ इच्छित असल्याचे ममतांनी सांगितले आहे. खरे कारण मात्र लवकरच पुढे येईल, हे ममता दिदींनाही ठाऊक आहेच. तरीही नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्री तृणमूल काँग्रेस सोडून का जात आहेत, हा प्रश्न कायम राहतो.
नाराजीची कारणं अनेक असू शकतात. परंतु, ममता दीदींचा पुतण्या व युवा काँग्रेस अध्यक्ष खासदार अभिषेक बॅनर्जी तसेच राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांची पक्ष संघटनेतील ढवळाढवळ अनेकांना पटत नाहीय. तसेही तृणमूलमधील संघटनात्मक पातळीवरील वाद उघड आहेतच.
शुक्लांच्या राजीनाम्यानंतर तृणमूलची हावडा येथील आमदार वैशाली दालमियाने एक विधान केले. ती म्हणाली की, चांगल्या लोकांना पक्षात काम करू दिले जात नाही. यावरूनही पक्षातील खदखद स्पष्ट होत आहे. त्यांनी चांगले काम करणाऱ्या नेत्यांचा पक्षात सातत्याने अपमान केला जातो, अशी खंतही व्यक्त केली आहे. यापूर्वीही तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे. यात तृणमूल सरकारमधील मंत्री सुवेंदू अधिकारी यांचाही समावेश आहेच. सध्या राजीव बॅनर्जीसह इतर अनेक आमदार आणि खासदार पक्षाच्या कार्यप्रणालीवर नाराज आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत नाराज नेत्यांना पक्षात टिकविण्याचे मोठे आव्हान तृणमूल काँग्रेसपुढे असेल.