अहमदाबाद – राजकारणात येणाऱ्या प्रत्येक नेत्याची चर्चा होते, परंतु नेत्यांचे नातेवाईक जेव्हा राजकारणात येतात, तेव्हा त्यांच्याबाबत अधिक चर्चा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीची अशीच चर्चा सध्या सुरू आहे. गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पंतप्रधानांच्या पुतणीने भाजपकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची सोनल मोदी ही कन्या आहे. सोनल मोदी यांनी अहमदाबाद महापालिका निवडणुकीसाठी बोडकदेव प्रभागातून रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोनल मोदी ह्या अहमदाबादमधील जोधपूरमध्ये राहतात. निवडणुकीसाठी माझी मुलगी पात्र असेल, तर तिला तिकीट मिळेल, अशी प्रतिक्रिया सोनल यांचे वडील प्रल्हाद मोदी यांनी दिली आहे. सोनल लोकशाहीप्रधान देशाची नागरिक असून तिला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तिचे काका देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्रभाईंना पक्षात आणि देशात मोठा मान आहे, असे त्यांनी सांगितले.
गुजरातमधील रणसंग्राम
गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी २१ आणि २८ फेब्रुवारी असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. एकूण ६ महापालिकांसाठीची निवडणूक २१ फेब्रुवारीला आणि २८ फेब्रुवारीला नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारी तर, दुसर्या टप्प्यातील निवडणुकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे.