नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून नुकतीच निवृत्ती पत्करलेला भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिग धोनी याच्या क्रिकेट मधल्या योगदानाबद्दल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं विशेष पत्र लिहून कौतुक केले आहे. क्रिकेट कारकिर्दीतली आकडेवारी आणि सामने जिंकण्यात असलेल्या सहभागासाठीच नाही, तर अनुकरणीय आदर्श व्यक्तीमत्व म्हणूनही तो कायम स्मरणात राहील असे कौतुकोद्गार, मोदी यांनी काढले आहेत.
एका छोट्या शहरातून अतिशय सामान्य स्तरावरुन सुरुवात करत, धोनीने जागतिक नावलौकिक मिळवला, असे त्यांनी म्हटले आहे. धोनी याची कठोर मेहनत आणि समर्पण या गुणांचीही प्रशंसा करत, मोदी यांनी धोनीचा उल्लेख महेंद्र असा आपुलकीने केला असून, त्याने भारताचा गौरव वाढवला असल्याचे, म्हटले आहे. संघाच्या कठीण परिस्थितीत धावून येत सामना वाचवणे आणि प्रसंगी जिंकूनही देणे, ही धोनीची वैशिष्ट्य, विशेषत: २०११ च्या अंतिम सामन्यात त्याने संघाला मिळवून दिलेला विजय क्रिकेट रसिकांच्या स्मरणात कायम कोरलेला राहील, असही मोदी यांनी या पत्रात नमूद केले आहे.