नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात बीड येथील पोलिस दलात शहीद झालेल्या रॉकी या श्वान सेनानीच्या कार्याबद्दल कौतुकास्पद उद्गार काढून त्याला आदरांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी गांभिर्याने दखल घेतल्याने बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
बीड पोलीस दलातील डॉग स्क्वॉड मध्ये काम करणाऱ्या रॉकी या श्वानाचे १५ ऑगस्टला निधन झाले. त्यावेळी त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. पोलिसांच्या सेवेत असताना रॉकीने ३५६ गुन्हे उघडकीस आणले होते. याशिवाय देशपातळीवर विविध स्पर्धांमधे भाग घेऊन बीड पोलिसांना त्याने अनेक पदकही मिळवून दिली होती. त्याची दखल पंतप्रधानांनी घेतल्याने रॉकीच्या कार्याची आता राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आहे.
भारतीय कुत्रा पाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित श्वानांचा उल्लेख केला. ते म्हणाले, आपल्या लष्करामध्ये, आपल्या सुरक्षा दलांकडे, असे कितीतरी बहादूर श्वान आहेत त्यांनी अनेक बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवायांना रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे, आयईडी आणि दारुगोळा शोधून काढल्याची त्यांनी अनेक उदाहरणे दिली. बीड पोलिसांनी साथीदार सदस्य श्वान रॉकी याला संपूर्ण सन्मानाने अखेरचा निरोप दिला, रॉकीने ३०० पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मदत केली होती, याचादेखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. स्थानिक प्रजातीच्या श्वानांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले, त्यांच्या पालनासाठी येणारा खर्च कमी आहे आणि ते भारतीय वातावरणात सामावले जातात. सुरक्षा संस्था स्थानिक प्रजातीच्या श्वानांना आपल्या सुरक्षा पथकात समाविष्ट करत आहेत. भारतीय कृषी संशोधन संस्थेने स्थानिक प्रजातीचे श्वान अधिक चांगले आणि लाभदायक ठरण्यासाठी त्यावर संशोधन केले आहे. त्यांनी श्रोत्यांना एक तरी स्थानिक प्रजातीच्या श्वानाचे पालन करावे, यासाठी प्रेरित केले.