नवी दिल्ली – मी पंतप्रधान झालो तर असा निबंध आपल्याला शालेय अभ्यासक्रमात असतो. आणि हाच प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुणाला विचारला तर ते काय उत्तर देतील? पण, हे खरे आहे. राहुल गांधी यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी पंतप्रधान झालो तर विकास दर वाढीऐवजी नोकर्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. हार्वर्ड केनेडी स्कूलचे राजदूत निकोलस बर्न्सशी झालेल्या संभाषणा दरम्यान राहुल गांधी यांनी हे मत व्यक्त केले.
निकोलस बर्न्सशी झालेल्या चर्चेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना, पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर त्यांचे आर्थिक धोरण काय असेल? या प्रश्नाला उत्तर देताना राहूल गांधी म्हणाले की, आपण रोजगार निर्मितीवर भर देणार आहोत. कारण आम्हाला विकासाची आवश्यकता आहे, परंतु आम्ही उत्पादन, नोकरी निर्मिती आणि मूल्यवर्धनासाठी सर्व काही करणार आहोत.
तसेच राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षाने देशातील संस्थात्मक संरचना पूर्णपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत, निष्पक्ष राजकीय लढाई निश्चित करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थाना सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
अमेरिकेतील सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था हार्वर्ड केनेडी स्कूलच्या विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी ऑनलाइन संभाषणात विविध विषयांचा उल्लेखही केला. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उपाययोजनांशी संबंधित प्रश्नावर राहूल गांधी म्हणाले की, आता लोकांच्या हातात पैसे देणे हा एकच पर्याय आहे. यासाठी आपल्याकडे ‘न्याय’ ही कल्पना आहे.