नवी दिल्ली – सध्या संसद भवनानजिकच नव्याने बांधण्यात येणाऱ्या संसद भवनाखाली सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तीन मोठी भुयारे तयार करण्यात येणार असून पंतप्रधान व उपराष्ट्रपतींच्या नवीन निवासस्थानांना तसेच खासदारांच्या कक्षांना ही भुयारे जोडली जातील. तिथून या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ये-जा सुरू झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरील ताणही कमी होणार आहे.
या भुयारातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना नव्या संसद इमारतीत आणण्यासाठी व तिथून परत नेण्यासाठी कारचा वापर करता येईल. नवे संसद भवन बांधण्याच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात साऊथ ब्लॉकच्या दिशेला पंतप्रधानांचे नवे निवासस्थान व त्यांचे नवे कार्यालय बांधले जाणार असून उपराष्ट्रपतींचे नवे निवासस्थान नॉर्थ ब्लॉकच्या दिशेला असेल. परंतु राष्ट्रपतींनी संसदेत येण्याचे प्रसंग खूप कमी येतात. त्यामुळे राष्ट्रपती भवन ते नवीन संसद भवन या दरम्यान भुयार बांधण्याचा अद्याप तरी विचार करण्यात आलेला नाही.
या प्रकल्पाची घोषणा केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये केली असून नव्या संसद भवनामध्ये सुमारे ९०० ते १२०० खासदारांची बसण्याची सोय असेल. त्याशिवाय नवे संयुक्त सचिवालय बांधण्यात येणार आहे.
राष्ट्रपती भवन ते इंदिरा गेट या दरम्यान ३ कि.मी. चा राजपथ हा पुन्हा नव्याने तयार करण्यात येईल. तसेच नवे संसद भवन बांधण्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर त्या परिसरातील सरकारी कार्यालयांचे नजीकच्या चार ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात येणार आहे.
पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०२२ देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन असून तोपर्यंत नवीन संसद भवन बांधून पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. संसदेचे २०२२ मधील पावसाळी अधिवेशन नव्या संसद भवनात भरविण्याचा मोदी सरकारचा विचार आहे.