“हर घर जल” या बोधवाक्याला अनुसरून २०२४ सालापर्यंत देशाच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरात सुरक्षित आणि पुरेसे पेयजल पोहोचविण्यासाठी भारत सरकारने जल जीवन अभियान सुरू केले आहे. या कार्यक्रमांतर्गत पाण्याचे पुनर्भरण आणि पुनर्वापर करण्यासाठी दूषित जलव्यवस्थापन, जलसंधारण, पावसाच्या पाण्याची साठवण अशा उपाययोजनाही राबविल्या जात आहेत. जल जीवन ही मोहिम पाण्यासाठीच्या सामुदायिक दृष्टिकोनावर आधारित आहे. सविस्तर माहिती, शिक्षण आणि संप्रेषण हे या मोहिमेचे मुख्य घटक आहेत. पाणी ही प्रत्येकासाठीच गरजेची बाब असल्याने पाण्यासाठी जनआंदोलन उभारणे, या दृष्टीकोनातून ही मोहिम राबविली जात आहे. भारतात सुमारे १९ कोटी कुटुंबे आहेत. त्यापैकी केवळ २४% लोकांकडे पिण्यायोग्य पाण्याच्या घरगुती नळजोडण्या (FHTCs) आहेत. या मोहिमेच्या माध्यमातून राज्य सरकारे, पंचायत राज संस्था आणि स्थानिक समुदाय अशा सर्व भागधारकांच्या भागीदारीतून १४, ३३, २१, ०४९ घरांना पिण्यायोग्य पाण्याच्या घरगुती नळजोडण्या (FHTCs) पुरवण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
अशी आहे योजना
जल जीवन मोहिमेंअंतर्गत भारत सरकारने मणिपूरला १,४२,७४९ घरे असणाऱ्या ११८५ वसाहतींना पिण्यायोग्य पाण्याच्या घरगुती नळजोडण्या (FHTCs) उपलब्ध करून देण्यासाठी निधी प्रदान केला आहे. राज्यातील उर्वरित कुटुंबांना अशा प्रकारे पाणीपुरवठा करण्यासाठी ईशान्य क्षेत्र विकास विभागाच्या निधीसह अतिरिक्त स्त्रोतांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्याची मणिपूर सरकारची योजना आहे. बाह्य अर्थसहाय्यित प्रकल्प असणाऱ्या या मणिपूर पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रेटर इम्फाळ नियोजन क्षेत्रातील उर्वरित घरे, २५ शहरे आणि १६ जिल्ह्यांतील १७३१ वसाहतींमधील २,८०,७५६ घरांना पिण्यायोग्य पाण्याच्या घरगुती नळजोडण्या (FHTCs) प्रदान केल्या जाणार आहेत. मणिपूर पाणी पुरवठा प्रकल्प हा २०२४ सालापर्यंत “हर घर जल” हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण घटक आहे. या प्रकल्पासाठी ३९५४.५८ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून, त्यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेतले जाणार आहे.