नवी दिल्ली – आपल्या देशात राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदावर असलेल्या महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. विशेषत: पंतप्रधानांच्या दौरा काळात सुरक्षेचा प्रश्न अधिकच चर्चेचा बनतो. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात आता हा खास ड्रोन तैनात करण्यात येणार आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने भारत इलेक्ट्रॉनिक्सला ड्रोन-विरोधी यंत्रणेच्या विकासाची आणि निर्मितीची जबाबदारी सोपविली आहे. सदर ड्रोन-विरोधी यंत्रणा आता नरेंद्र मोदींच्या सुरक्षेचा भाग असल्याचेही सांगितले जात आहे. त्यांच्या निवासस्थानाव्यतिरिक्त पोर्टेबल ‘ड्रोन किलर’ देखील त्यांच्या दौऱ्या दरम्यानच्या काळात ताफ्यात तैनात असतील. परकीय शक्ती आणि दहशतवाद्याकडून ड्रोनचा धोका लक्षात घेता यावर्षाच्या सुरूवातीपासूनच ही सुविधा आवश्यक केली गेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शस्त्रे पाठविण्यासाठी चिनी बनावटीचे अनेक व्यावसायिक ड्रोन वापरत आहेत. त्यामुळेच डीआरडीओने निष्क्रिय आणि सक्रिय एंट्री ड्रोन तंत्रज्ञान विकसित केले आहे. सदर ड्रोन हे शत्रूंच्या ड्रोनला अकार्यक्षम करून नष्ट देखील करू शकतात. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी लवकरच स्वदेशी ड्रोन अँटी-ड्रोन सिस्टमच्या निर्मितीसंदर्भात सैन्य दलाला माहिती देणार आहेत. सध्या प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन समारंभात तैनात असलेल्या ड्रोनची अँटी-सिस्टमची रेंज २ ते ३ किमी आहे. सदर यंत्रणेद्वारे शत्रूचे ड्रोन शोधून काढतो आणि वारंवारता सिग्नलद्वारे यूएव्हीला जाम करतो. शुत्रचे ड्रोन शोधून काढल्यानंतर लेसर बीमला लक्ष्य करणे हा आणखी एक विकसीत पर्याय यात आहे.
दरम्यान, सन २०१९ पासून पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी काश्मीर आणि पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोन उडवून ड्रग्स आणि शस्त्रे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एलओसी आणि आयबीवरही अशीच पद्धत अवलंबली जात आहे. बाजारात उपलब्ध चिनी ड्रोन १० किलोग्रामपर्यंत शस्त्रे किंवा मादक द्रव्ये नेऊ शकतात. त्यामुळेच डीआरडीओने कडक सुरक्षा यंत्रणांसह ड्रोन-विरोधी यंत्रणा देखील विकसित केली आहे. नियंत्रण रेषेवर या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे आणि शत्रूंच्या हवाई धोक्यातून मुक्त होण्यात यश आले आहे.