आयुष्यात राहून गेलेली एक खंत,
पंडित जसराज जी,सुधीर फडके आणि डॉक्टर विजय भटकर या तिघांचाही नाशिक मध्ये पंचवटीतील स्वामी सरस्वती नंद यांच्या मठातर्फे खाजगीतील सत्कार सोहळा विशेष मोजक्याच निमंत्रितांसाठी आयोजित केलेला होता. सकाळीच अकरा वाजेपासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वरील तिघांसोबत गप्पा गोष्टी आणि त्यांचा सहवास लाभण्याचा योग घडून आला होता. हा योग सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा असा की पंडितजींचा पूर्वपरिचय असल्यामुळे कदाचित किंवा तसा योग असल्यामुळे पंडितजी संध्याकाळी पाच वाजता मला म्हणाले, ‘नंदेशजी आज शाम को मैफिल जमायेंगे. आप बंदोबस्त की जीएगा’, त्यांच्या उत्स्फूर्त इच्छेमुळे मी खूप आनंदित होऊन मैफिलीची व्यवस्था करण्यासाठी पुढे सरसावलो.
आणि त्यादिवशी माझे दुर्दैव असे की, माझ्या घरातील लॉन पासून तर ग्रीन व्ह्यू हॉटेल, ताज हॉटेलपर्यंतचे कुठलीही जागा उपलब्ध होऊ शकली नाही. माझी ही सगळी खटपट पंडित जी पाहत होते.
सात वाजेपर्यंत काही होऊ शकले नाही. शेवटी संध्याकाळी साडेसात वाजता माझी असहाय्यता बहुतेक पंडितजींच्या लक्षात आली आणि चहा घेताना ते मला म्हणाले, ‘नंदेशजी जाने दो. फिर कभी नासिक आना हूआ, तो आपके घरमे जरूर मैफिल जमायेंगे’.
अणि ती खंत कायमची राहून गेली.
त्यानंतर ही रुखरुख मी नाशिक मधील माझ्या संगीत प्रेमी मित्रांना बोलून दाखविली. त्यावर प्रत्येकाने प्रतिक्रिया अशी दिली की अरे मला फोन केला असता तर काहीतरी व्यवस्था निश्चित केली असती. बाबूंजी बरोबर बसून पंडित जसराजजींच्या संगीत आविष्काराचा अमृत योग अनुभवता आला असता.
पंडितजींच्या जाण्यामुळे अखेर ती खंत कायमची राहून गेली.
– नंदेश यंदे, उद्योजक