मनाली देवरे, नाशिक
…..
गुंणाच्या टेबलमध्ये तळ गाठलेला असतांना देखील जिंकण्याची जिद्द ठेवूनच प्रत्येक सामना खेळणा-या किंग्ज इलेव्हन पंजाबने मंगळवारी ५ गडी राखून १९ व्या षटकातच सामना जिंकला. त्यांनी या सिझनमधील सर्वाधिक यशस्वी ठरत असलेल्या दिल्ली कॅपीटल्स सारख्या संघाला धुळ चारली. त्यामुळेच पंजाब मेल धडधडली…..दिल्लीची टीम अडखळली… असे विश्लेषण या सामन्याबाबत एका अोळीत करता येईल.
दिल्ली विरूध्दच्या सामन्यात १६४ धावांचा पाठलाग करतांना के.एल.राहूल आणि मयंक अग्रवाल पहील्यांदाच अपयशी ठरले. ख्रिस गेल १३ चेंडूत २९ धावा काढून परतला. त्यामुळे पंजाब सघाच्या डगआउट मध्ये चिंता पसरली होती. परंतु, त्यानंतर २८ चेंडूत ५३ धावां काढणा–या निकोलस पुरनने ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने विजय सोप्या मार्गावर आणून ठेवला होता. त्यानंतर खेळला तो ग्लेन मॅक्सवेल, ऑस्टेलियाचा ऑल राउंडर. २०१४ सालचे आयपीएल मॅक्सवेलने गाजवले होते तेव्हापासून आयपीएलमध्ये मॅक्सवेलचा दबदबा आहे. पंजाबने या खेळाडूवर लिलावात १०.७५ करोडची बोली लावून त्याला संघात घेतले होते. परंतु, या सिझनमध्ये ९ सामन्यात फक्त ५८ धावा करणा–या मॅक्सवेलला एकही षटकार खेचता आला नाही. त्यामुळेच तो सोशल मिडीयावर टिकेचा धनी बनला आहे. मॅक्सवेलने आज पहिल्यांदा एक छोटीशी परंतु, दर्जेदार खेळी करून स्वतःचा लौकीक परत आणण्याचा प्रयत्न केला असे म्हणायला हरकत नाही.
गब्बर को पता चला……
दिल्ली संघाचा चेहरा “यंगस्टर्स” म्हणून या सिझन मध्ये प्रसिध्द झाला होता. ही टीम तरूण खेळाडूंची आहे आणि त्यामुळे सातत्याने यशस्वी होत असलेल्या दिल्लीतल्या नव्या दमाच्या खेळाडूंना विजयाचे श्रेय दिले जात होते. सुरूवातीला धवन अपयशी ठरल्याने आणि यंगस्टर्स सातत्याने धावा करीत असल्याने धवनवर जोरदार टिका सुरू झाली होती. त्याचे अपयश नवीन खेळाडू चांगला खेळ करत असल्याने झाकले जात आहे. अशी बोचरी टिका देखील अनेकांनी केली. परंतु, गब्बरको पता चला…..असे म्हणत शिखर धवन या ३४ वर्षीय तरूणाने उसळी घेतली आणि अचानक दिल्ली संघाची ओळखच आता बदलून गेली आहे. शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द झालेल्या सामन्यात शिखर धवनने नाबाद १०१ धावा करून त्याच्या १३ वर्षाच्या आयपीएल कारकिर्दीतीले पहिले शतक झळकवले होते. त्यानंतर मंगळवारी म्हणजे अवघ्या ४ दिवसांनी किंग्ज इलेव्हन पंजाब विरूध्द सलग दुसरे शतक झळकावून “गब्बर” या आपल्या टोपन नावाची शान राखली. आता १० सामन्यात ४६५ धावा करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दुस–या क्रमांकावर असलेल्या मयंक अग्रवालला त्याने मागे टाकले असून त्याच्या पुढे १० सामन्यात ५४० धावा करणारा के.एल.राहूल पहिल्या क्रमांकावर आहे.
दिल्ली कॅपीटल्सने या सामन्यात एकुण १६४ धावा केल्या. त्यापैकी १०६ धावा शिखर धवनच्या आहेत, त्या देखील अवघ्या ६१ धावात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, उर्वरीत ५९ चेंडूत इतर दिल्लीकर बॅटसमनला अवघ्या ५८ धावा करता आल्या. दिल्लीची धावसंख्या १८० च्या पुढे जाणे अपेक्षीत असतांना देखील दुस–या बाजुने धावा वेगाने गोळा करण्यात फंलदाज अपयशी ठरत गेल्याने दिल्लीचा पराभव अटळ ठरला. मोहम्मद शामी आणि रवि बिश्नोई पंजाबासाठी गोलंदाजीत महत्वाचे योगदान देत आले आहेत. आज त्याच्या जोडीला ग्लेन मॅक्सवेलने देखील चांगली गोलंदाजी केल्याने दिल्लीला मोठे टारगेट सेट करण्याचे शिखर गाठता आले नाही.
बुधवारची लढत
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघादरम्यान बुधवारची लढत होईल. दोघांमध्ये तिस–या आणि चवथ्या स्थानासाठी चुरस सुरू आहे. त्यात चवथ्या क्रमांकावर येण्यासाठी सध्या तरी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स धडपड करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थान पक्के करण्यासाठी झटतांना या दोन्ही संघादरम्यान चुरशीचा सामना बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.