नवी दिल्ली – देशातील महत्वाच्या व मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या बँक पंजाब नॅशनल बँकेने १ डिसेंबरपासून एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्याचे ठरविले आहे. वाढत्या फसवणूकीसह पीएनबी एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी वन-टाईम पासवर्ड (ओटीपी) सिस्टम राबवित आहे. ही नवीन प्रणाली १ डिसेंबरपासून अंमलात येईल. त्याअंतर्गत एटीएममधून रोकड काढण्यासाठी तुम्हाला बँकेकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी सांगावा लागेल. हा नियम १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांना लागू असेल.
ट्वीटरद्वारे बँकेने याबाबत माहिती दिली आहे. येत्या डिसेंबरपासून सकाळी १ ते ८ या दरम्यान पीएनबीच्या एटीएममधून एकावेळी १० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढणे आता ओटीपी सिस्टमवर आधारित असेल. म्हणजेच पीएनबी ग्राहकांना या तासांत १० हजार रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. म्हणून ग्राहकांनी त्यांचा मोबाईल सोबत ठेवण्यास विसरू नये, असे बँकेने जाहीर केले आहे.
दरम्यान १ एप्रिलपासून अंमलात आलेल्या निर्णयानुसार युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे आता पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अस्तित्वात आलेल्या नवीन बँकेचे नाव पीएनबी २.० आहे. याबाबत बँकेचे ट्वीट आणि संदेशात स्पष्टपणे सांगितले आहे की, ओटीपी आधारित रोख रक्कम फक्त पीएनबी २.० या एटीएमवर लागू होईल. म्हणजेच इतर बँक एटीएममधून पीएनबी डेबिट व एटीएम कार्डमधून पैसे काढण्यासाठी ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची सुविधा लागू होणार नाही.