चंदीगढ – कृषी विधेयकावरून नाराज झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांनी आता सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. या संतप्त शेतकऱ्यांनी आता मोबाइल टॉवरना लक्ष्य केले आहे. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जवळपास १५६१ टॉवर्सचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या या कृत्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांना इशारा दिला आहे. यापुढे कोणी असे कृत्य केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वतीने रवीन ठुकराल यांनी हे ट्विट केले आहे.
कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही आम्ही माफ करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सध्या राज्यातील १५६१ मोबाइल टॉवर प्रभावित झाले असून त्यातील २५ टॉवर्सची तोडफोड करण्यात आली आहे. आतापर्यंत ४३३ टॉवर्स दुरुस्त करण्यात आले आहेत. यामुळे मोबाइल तसेच इंटरनेट सेवेवर परिणाम होतो आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो आहे. तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना त्रास होत आहे.
राज्याच्या ग्रामीण भागातील ११२८ टॉवर्स बंद आहेत. शेतकऱ्यांनी या टॉवर्सचे नुकसान करण्यासोबतच वीजेचे कनेक्शन तसेच नेटवर्कच्या केबलही तोडल्या आहेत. केवळ भटिंडा जिल्ह्यातच ३०० गावातील विजेचे कनेक्शन तोडले आहेत. शहरातील टॉवर्सच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी ग्रामीण भागातील लोकांना त्रास होतो आहे. राज्यात जिओचे ९ हजारांहून अधिक टॉवर्स आहेत. त्याचे नुकसान झाल्याने अनेकांनी सिम कार्ड बदलली.
दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रदेश सचिव सिंगारा सिंह मान यांनी सांगितले की, आमच्या संघटनेने जिओ टॉवर तोडण्याचा कसलाही निर्णय घेतलेला नाही. हे नुकसान कोणी केले याची आम्हाला माहिती नाही. लोक स्वतःहून अशी पावले उचलत आहेत. आम्ही स्वतः अशा तोडफोडीच्या विरोधात आहोत.