नाशिक – लॉकडाऊन नंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु झाल्या असून नाशिक-मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी पंचवटी एक्सप्रेस कोविड स्पेशल म्हणून सुरु करण्यात आली. मात्र, रेल्वेतर्फे आकारण्यात येणाऱ्या वाढीव दराच्या तिकिटांमुळे प्रवाशांना नाशिक-मुंबई प्रवास परवडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंचवटीचे खरे लाभधारकच वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे सेवा १२ सप्टेंबर रोजी पुन्हा सुरू झाली. परंतु प्रवासासाठी मासिक हंगामातील तिकिटांना तूर्तास परवानगी देण्यात आलेली नाही. प्रवाशांना तिकिट ऑनलाइन खरेदी करणे किंवा आरक्षण काउंटरवरून तिकीट घेणे बंधनकारकी करण्यात आले आहे. आरक्षणासाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे प्रवाश्यांची सांगितले आहे. सध्याची आरक्षित रक्कम ही पूर्वीपेक्षा १० पट असल्याने प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंचवटी एक्सप्रेस मुंबई सीएसएमटी ते मनमाड दरम्यान दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड आणि लासलगाव या स्थानकांवर थांबते. मुंबईत कामासाठी असणारे बहुतांश चाकरमाने याच रेल्वेवर निर्भर असतात. प्रत्येकास हजारो रुपये खर्च करणे शक्य नसल्याने मासिक पासच्या सुविधेचा वापर बहुतांश जण करत असतात. मात्र आता रेल्वेने भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. मासिक पास वापरण्याची परवानगी रेल्वेने दिली नसल्याने अनेकांना पंचवटीच्या प्रवासापासून वंचित राहावे लागत आहे.