नाशिक : अवैध धंद्याचा समुळ उच्चाटनासाठी पंचवटी पोलीसांनी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात परिसरात राबविलेल्या विशेष मोहिमेत तीन जुगार उड्डे उध्वस्त करीत २५ जुगारींना जेरबंद केले. या कारवाईत दीड लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यात रोकड व जुगाराच्या साहित्याचा समावेश आहे. तर अवैधरित्या दारू विक्री करणाºया चौघांना बेड्या ठोकत त्यांच्या ताब्यातून सुमारे ५५ हजार ४१७ रूपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईची गंभीर दखल घेत पोलीसांनी अवैध धंदे सुरू असलेल्या ठिकाणचे लाईट आणि नळ कनेक्शन बंद करण्याबाबतचा पत्रव्यवहार संबधीत विभागाशी केल्याने अवैधधंदे चालकाचे धाबे दणाणले आहेत.
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आपल्या आगमनापासून अवैध धंद्याना लक्ष केले आहे. ज्या पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू राहतील त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येईल असा इशाराच पाण्डेय यांनी दिल्याने शहर पोलीस कामाला लागले आहेत. पंचवटी पोलीसांनी जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात विशेष मोहिम राबवून पंचवटी परिसर पिंजून काढत अवैध धंद्याचा शोध घेतला. त्यात तीन ठिकाणी जुगार व मटका अड्डे सुरू असल्याचे समोर आले. खब-याने दिलेल्या माहितीवरून पोलीसांनी छापा सत्र राबवून जुगार अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत २५ जुगारींना बेड्या ठोकण्यात आल्या असून घटनास्थळावरून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ लाख ४६ हजार ३५७ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच अवैध मद्यविक्रीवर लक्ष केंद्रीत करीत पोलीसांनी वेगवेगळया भागातून चौघांना जेरबंद केले. संशयीतांच्या ताब्यातून ५५ हजार ४१७ रूपयांचा मद्यसाठा जप्त केला. ही कारवाई पंचवटीचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत व निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार यांच्या पथकाने केली. दरम्यान अवैध धंद्यासाठी कुणीही जागा उपलब्ध करून देवू नये यासाठी पोलीसांनी नवा फंडा हाती घेतला असून ज्या ठिकाणी अवैध धंदा सुरू असेल त्या ठिकाणचे नळ आणि वीज कनेक्शन रद्द करण्याचा पत्रव्यवहार महापालिका आणि वीज कंपनीकडे करण्यात आला आहे. यामुळे जुगारींबरोबरच जागा मालकांचेही धाबे दणाणले आहेत.