वेलिंग्टन – एकीकडे संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. दुसरीकडे न्यूझीलंडने कोरोनावर नियंत्रण मिळवून जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही जगातील अनेक देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी तसेच तिसरी लाट आल्यामुळे सरकार आणि नागरिक चिंतीत आहेत. भारताबाबत बोलायचे झाल्यास गेल्या वर्षभरात प्रथमच एका दिवसात एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती केवळ भारतातच नव्हे, तर इतर देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अशीच आहे.
न्यूझीलंडबाबत बोलायचे झाल्यास, तिथे आतापर्यंत एकूण २५०७ रुग्ण आढळले असून, तेवढेच रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनासंसर्गामुळे आतापर्यंत फक्त २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे न्यूझीलंडने कोरोनावर कशी मात केली हा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.
गेल्या वर्षी महामारी विक्राळ रूप धारण करत असताना न्यूझीलंडमध्ये रुग्णसंख्येत जबरदस्त घट झाली होती. सर्वात आधी न्यूझीलंडने धोका ओळखून सर्व सीमा सील केल्या होत्या. संसर्ग झालेला रुग्णांनी विलगीकरणात राहण्याचा नियमही न्यूझीलंडमध्ये काटेकोरपणे लागू करण्यात आला होता. एवढेच नव्हे न्यूझीलंडने सर्वात प्रथम लॉकडाउन उठवून सर्व कार्यालये आणि मॉल्स उघडले होते.
कोरोनाचा धोका ओळखून न्यूझीलंडमध्ये जिनोम सिक्वेंसिंग आणि एपिडेमियोलॉजींची मदत घेण्यात आली. याच तंत्रज्ञानाच्या मदतीनेच न्यूझीलंड प्रयोगशाळेच्या रूपाने ओळखला जाऊ लागला. कोरोनाचा वेग रोखण्यासाठी न्यूझीलंड सरकारने कोरोनाबाधितांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही शोधून काढले होते. त्यानंतर जिनोम सिक्वेंन्सिंगच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव झाला हे शोधण्यात तज्ज्ञांना मदत झाली. त्यांना विलगीकरणात ठेवून उपचार करण्यात आले. संसर्गग्रस्त भागांमध्ये सलग लॉकाडाउनही लावण्यात आला. काही तज्ज्ञ आणि सल्लागारांच्या मदतीने सरकारने पुढील रणनीतीही बनविली. सामुहिक संसर्ग येण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसात न्यूझीलंडमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही.
जिनोम सिक्वेन्सिंग अमेरिका आणि ब्रिटनमध्येसुद्धा लागू करण्यात आली होती. परंतु प्रत्येक वेळी असे करण्यात आले नाही. त्यामुळे तिथे अद्याप रुग्णसंख्या वाढत आहे. भारतामध्ये केवळ एक टक्का जिनोम सिक्वेन्सिंगची मदत घेण्यात आली. जिनोम सिक्वेंन्सिंगसंबंधित वैज्ञानिक डॉ. जेम्मा जियोंगेगेन यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमध्ये जवळपास ३० हजार जिनोम असतात.
जेव्हा विषाणूमुळे संसर्ग होतो, तेव्हा विषाणूमध्ये काही बदल होतात. विषाणूंच्या विविध प्रकारांची मदत घेऊन वैज्ञानिक त्यांचे फॅमिली ट्री बनवतात. त्यामुळे विषाणूंमधील लहान बदलही लक्षात येतात. विषाणूचा संसर्ग कशाप्रकारे फैलावत आहे याबाबतची माहिती मिळू शकते. विषाणूमधील बदल लक्षात आले की कोरोना लसीमध्ये बदल करू शकता येतो. त्याचाच परिणाम न्यूझीलंडमध्ये दिसला आहे.