मुंबई – राज्यात दंतवैद्यक पदवी (बीडीएस) तसेच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळेच बीडीएसच्या परीक्षा येत्या १७ ऑगस्ट रोजी तर वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या २५ ऑगस्टला घेतल्या जाणार आहेत. तसे महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठाने ठरविले आहे.
परीक्षा केंद्रांमधे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन या परीक्षा द्यायला विरोध करणा-या जनहित याचिकेची सुनावणी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठा समोर आज (१४ ऑगस्ट) झाली. या परीक्षा पुढे ढकलण्याचे किंवा ऑनलाईन परीक्षा घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. मात्र या परीक्षांना काहींचा विरोध आहे, तसाच काहींचा पाठिंबाही आहे.
शिवाय सर्वोच्च न्यायालयातही अशा काही याचिका दाखल आहेत, याची नोंद खंडपीठाने घेतली. शेवटच्या क्षणी या परीक्षांना स्थगिती देणे हा या परीक्षेची तयारी केलेल्या आणि परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताविरुद्ध ठरेल, असे न्यायालयाने सांगितले.
या परीक्षा घेतल्या नाही तर विद्यार्थ्यांना पुढच्या पातळीवरचे शिक्षण घेता येणार नाही, तसेच कोणत्याही क्षेत्रात विशेषज्ञ म्हणून अर्हता मिळवता येणार नाही. याकडे महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापिठाने न्यायालयाचे लक्ष वेधले. याचिकाकर्ते डॉक्टर असून, ते परीक्षेसाठी प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर जायला तयार नसतील, तर रुग्णांवर उपचार करायला कसे बाहेर पडतील, असा सवालही न्यायालयाने केला. त्यानंतर विद्यापठाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या.