मुंबई – राज्यभरातील न्यायालयांमध्ये दोन शिफ्टमधील कामकाज येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. उच्च न्यायालयाचे महाअधिक्षक एस जी दिघे यांनी यासंदर्भातील सूचना जारी केले आहेत. मात्र, पुणे जिल्ह्यातील न्यायालये लॉकडाऊन काळाप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
सकाळी ११ ते दुपारी १.३० आणि दुपारी २.०० ते सायंकाळी ४.३० अशा दोन शिफ्टमध्ये हे कामकाज सुरू होणार आहे. न्यायालयातील सर्व कर्मचारी या दोन्ही काळात हजर राहणार आहेत. पहिल्या शिफ्टमध्ये पुराव्याची कामे तर दुसऱ्या शिफ्टमध्ये न्यायदानाशी संबंधित कामकाज होणार आहे. कोरोनाशी निगडीत सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. मास्क असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, कोरोनाची लक्षणे असलेल्यांनाही प्रवेश नाकारला जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क आदींचे कसोशीने पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन शिफ्टमधील कामकाजामुळे लॉकडाऊन काळातील अनेक प्रलंबित खटल्यांच्या कामकाजाला गती मिळणार आहे. परिणामी, वकील, पक्षकार या सर्वांनाच मोठा दिलासा मिळणार आहे.