नाशिक – शहरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत झपाट्याने वाढत आहे. काही नागरिक विना मास्क घराबाहेर पडत असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणच्या दर्शनी भागात “नो मास्क, नो एन्ट्री” चे स्टिकर्स लावून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिकमध्ये कोविड-१९ संसर्गाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत असून जवळपास प्रत्येक परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे. महानगरपालिका हद्दीत रोज १००० पेक्षा जास्त नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. बहुतांश कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू हा कोरोना विषाणूची लक्षण नसताना ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शहरात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बहुतांश भागात नागरिक विना मास्क फिरत असतात. तर काही गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टसिंग नियमांचे पालन होताना दिसत नाही. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मास्क व सॅनिटाझरचा वापर हा स्वतःच्या सुरक्षेसाठी करणे गरजेचे आहे. तसेच घरा बाहेरून आल्यानंतर कुटुंबाला विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. नाशिक महानगरपालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंड आकारण्यासोबतच जनजागृती करण्यावर भर देण्याची सध्या नितांत गरज आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरातील प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी, दुकानांबाहेर, सरकारी कार्यालयाबाहेर, सोसायटी व इमारतीच्या बाहेर “नो मास्क, नो एन्ट्री” स्टिकर्स लावणार आहे. तसेच दुकानदारांना मास्क न लावता येणाऱ्या ग्राहकांना मास्क लावण्यासाठी आग्रह करण्याची विनंती या जनजागृतीतून करण्यात येत आहे. मला काही होत नाही हा नागरिकांच्या मनातील भ्रम या जनजागृतीतून नाहीसा करण्याचा प्रयत्न असल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले आहे.
यावेळी शहर उपाध्यक्ष किरण पानकर, निलेश सानप, हर्षल चव्हाण, मध्य विधानसभा अध्यक्ष जय कोतवाल, सिडको विभाग अध्यक्ष मुकेश शेवाळे, पूर्व विभाग अध्यक्ष सागर बेदरकर, राहुल कमानकर, करण आरोटे, रामेश्वर साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.