नवी दिल्ली – यावर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरु झाली आहे. वैद्यक क्षेत्रासाठीचा २०२० या वर्षाचा नोबेर पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना जाहीर करण्यात आला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूचा शोध लावणाऱ्या हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस या तिघांना हा पुरस्कार मिळणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या विषाणूच्या शोधामुळे ही बाब समोर आली. परिणामी, या विषाणूला नष्ट करण्याचे संशोधन करण्यात आले. त्यामुळे गंभीर आजारातून मानवाला मुक्ती मिळण्यासाठी या विषाणूचा शोध महत्त्वाचा आहे. या त्रिमूर्तींच्या संशोधनामुळे हिपॅटायटीस सी विषाणूंद्वारे होणारे आजार आता बरे होऊ शकतात. या संशोधनामुळे या संबंधित आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येतात. तसेच लाखो लोकांचे जीवन वाचवणारी नवीन औषधेही तयार करण्यात आल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.