नवी दिल्ली – गेल्या चार वर्षापुर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली. नोटाबंदीच्या घोषणेनंतर अवघ्या चार तासातच हैदराबादस्थित तीन ज्वेलर्स कंपन्यांनी तातडीने १११ कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची बाब उघड झाली आहे.
८ नोव्हेंबर, २०१६ रोजी सकाळी ८ ते मध्यरात्रीपर्यंत ६,००० ग्राहकांनी त्यांच्या अनेक शोरूममध्ये सोन्या-चांदी आणि दागिन्यांची प्रचंड खरेदी केली, असे सांगून त्यांनी बँकांना बनावट रोख पावती आणि विक्री पावत्या तातडीने दाखविल्या. मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणांची चौकशी करणार्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) याचा खुलासा केला आहे.
नोटाबंदीच्या वेळी सावकाराशी संबंधित आर्थिक अनियमिततेच्या प्रकरणात ईडीने हैदराबादच्या ज्वेलर्स हाऊस आणि त्यांच्या प्रवर्तकांकडून सुमारे १११ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार मुसुद्दीलाल जेम्स अँड ज्वेलस प्रायव्हेट लिमिटेड, वैष्णवी बुलियन प्रायव्हेट लिमिटेड आणि मुसुद्दीलाल ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडविरूद्ध ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एजन्सीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोन आरोपपत्र दाखल केले होते.
ईडीच्या म्हणण्यानुसार, जप्त केलेल्या संपत्तीपैकी एकूण मालमत्ता आणि उर्वरित स्टॉक, सोने-चांदी आणि दागिन्यांमध्ये गुंतवणूकीच्या स्वरूपात आहेत. त्यांचे एकूण मूल्य १३० कोटी रुपये इतके आहे. ईडीचा दावा आहे की, मुसुद्दीलाल जेम्स आणि त्याचे मुलगे यांचे प्रमोटर कुसंद चंद गुप्ता यांच्या कंपन्यांनी त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट संजय शारदा यांची भेट घेऊन बनावट पावती तयार केली आणि उत्पन्नाचे बनावट स्त्रोत दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे जमा केले.