नाशिक – नोकरीच्या पहिल्याच दिवशी कामावर हजर झालेल्या वृद्ध सुरक्षा रक्षकाला मृत्यूने कवटाळले आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत ही दुर्घटना घडली आहे. कारखान्यातील मटेरियल लिफ्टच्या खाली दाबले गेल्याने या वृद्ध सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी औद्योगिक वसाहतीत हळहळ व्यक्त केली जात असून अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटू सुपडू खाटीक (६७ रा. दत्तनगर, चुंचाळे शिवार, मुळ रा. शिरपूर जि. धुळे) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर ई – ७४ मधील यु के मेटल या कारखान्यात ही घटना घडली. खाटीक या कारखान्यात सोमवारी (दि.२) दाखल झाले होते. पहिल्याच दिवशी त्यांना रात्रपाळीसाठी बोलविण्यात आले होते. सायंकाळी सेवा बजावण्यासाठी ते कारखान्यात दाखल झाले असता ही घटना घडली.
कारखान्यात रात्री मटेरिअल डिस्पॅच करण्याचे काम सुरू होते. पहिल्या मजल्यावरील मटेरिअल लिफ्टद्वारे खाली आणून वाहनात भरले जात होते. मटेरिअलने भरलेली वाहने मध्यरात्री रवाना झाल्याने खाटील हे पहाटेच्या सुमारास लिफ्ट खाली जमिनीवर पेपर टाकून झोपी गेले. अचानक लिफ्ट खाली आल्याने ते त्याखाली दाबले गेले. संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना निदर्शनास येताच कंपनीतील कामगारांनी अंबड पोलिसांना फोन केला. वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अधिक तपास हवालदार मारुती भड करीत आहेत.