नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलनं नोकरीचं आमिष दाखवून गंडवणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीमध्ये पी.एचडी. आणि इंजिनिअरिंग झालेले लोक सहभागी आहेत. या टोळीनं देशभरातील जवळपास ५०० हून अधिक लोकांकडून ७.५० कोटी रुपये उकळले आहेत. संशयित आरोपी पीडितांकडून २० लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते.
आरोपींची ओळख पटली असून, भुवनेश्वरचा मनोज होता (४४), गुरुग्रामचा आशिष रंजन (२६), अभिषेक कुमार (२७), सोनू रावल (२९) आणि शैक पिंटू (२८) अशी त्यांची नावं आहेत, ही माहिती सायबर सेलचे डीसीपी अन्येष राय यांनी दिली.
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी लावून देण्यासाठी काही लोकांनी संपर्क केला होता. इंनडीच करिअर, जोटिक करिअर, चॉईस प्रायव्हेट लिमिटेड, सँडबीप एडू सोल्यूशन, बीएसईपीएल एज्युकॉन प्रा. लि. या नावानं प्लेसमेंट एजन्सी चालवत असल्याचा दावा आरोपींनी केला होता. अशी तक्रार उत्तमनगरचा रहिवासी असलेल्या एका पीडित युवकानं दाखल केली होती.
पीडित युवक टोळीच्या जाळ्यात फसला. त्याच्याकडून कागदपत्र, प्रोफाईल योग्यता परीक्षण आणि २० लाख रुपये घेतले होते. तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकानं तपास सुरू केला. आरोपींनी अनेक संकेतस्थळं आणि ई-मेल आयडी तयार करून ठेवली आहेत. पीडित युवकाला अनेक बँकांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगतिलं.
गुरुग्राममध्ये कॉल सेंटर
आरोपी गुरुग्राममध्ये कॉल सेंटर चालवून लोकांना फसवत होते. पोलिस पथकानं कॉल सेंटरवर छापा मारून मनोज होता याच्यासह पाच संशयितांना अटक केली. कॉल सेंटरमधून सात कॉम्प्युटरसह लॅपटॉप आणि १४ मोबाईल जप्त केले. मनोज होता भुवनेश्वरचा रहिवासी आहे. इतर आरोपी गुरुग्राम इथले रहिवासी आहेत. मनोज यानं पुण्यात एका प्रतिष्ठीत विद्यापीठात एमबीए आणि पी.एचडी. केलेली आहे. मनोजला व्यवसायात मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर गुरुग्राममध्ये कॉल सेंटर उघडून तो बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवत होता.