नाशिक – नाशिक – औरंगाबाद या महामार्गावरील असलेल्या नैताळे येथील ग्रामस्थांचे आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांचा अखंड १५ दिवस चालणारा यात्रोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला भरविला जातो. मात्र यंदा कोविड – १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारी पर्यंत लाॅकडाउनचे नियम कायम केले आहे. त्यामुळे यावर्षी २८ जानेवारी रोजी म्हणजे पौष पौर्णिमेला भरविला जाणारा यात्रोत्सव भरविण्यास परवानगी नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे, महापूजा व रथपूजा हा धार्मिक कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरून देवस्थान ट्रस्ट् करू शकेल, अशी माहिती निफाडच्या प्रांताधिकारी डाॅ. अर्चना पठारे यांनी दिली.हा यात्रोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला अखंड १५ दिवस भरविला जातो. यात्रोत्सवास दरवर्षी १० ते १२ लाखांहून अधिक भाविक येत असतात. येवला , नांदगाव, सिन्नर, कळवण, निफाड, सटाणा, मालेगाव, जळगाव, धुळे या भागातील भाविकांची संख्या मोठी असते. भाविक श्रध्देपोटी देवाला बोकडबळीचा नवस कबूल करतात हाच नवस फेडण्यासाठी भाविक नैताळे येथे श्री मतोबा महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात यात्रोत्सवात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने थाटलेली असतात, ती आता असणार नाही. दर्शनासाठी भाविकांना गर्दी करता येणार नाही. दर्शनासाठी श्री मतोबा महाराजांचे मंदिर खुले राहणार असून, भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरून दर्शन घेण्यास हरकत नाही .महाराष्ट्र शासनाने ३१ जानेवारीपर्यंत लाॅकडाउनचे नियम कायम केलेले असल्याने नियमांचे पालन करणे बंधनकारक आहेत. २८ जानेवारी रोजी म्हणजे पौष पौर्णिमेला श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट महापूजा व रथपूजा हा धार्मिक कार्यक्रम करू शकताेे, मात्र जादा गर्दी होणार नाही याची काळजी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने घ्यावयाची आहे,असेही प्रांताधिकारी डाॅ.अर्चना पठारे यांनी सांगितले आहे.