काठमांडू ः नेपाळमधील ओली सरकारमधून आपल्या मंत्र्यांना माघारी बोलावण्याच्या घोषणेनंतर पुष्प कमल प्रचंड यांच्या नेतृत्वखालील कम्युनिस्ट पार्टीनं त्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. पक्षाच्या रविवारी झालेल्या बैठकीनंतर एक निवेदन जारी करण्यात आले आहे.
प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील पक्षानं शिस्तीचा हवाला देऊन ओली सरकारमधील गृहमंत्री राम बहादूर थापा आणि ऊर्जामंत्री तोप बहादूर रायमाझी यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. पक्षाच्या सर्व मंत्र्यांना शनिवारी माघारी बोलावण्यात आले होते. तसेच सरकारी पदांवर नियुक्त नेत्यांनी २४ तासांच्या आत परिस्थिती स्पष्ट करावी, असेही सांगण्यात आले होते.
गृहमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांनी पक्षाच्या निर्देशांवर आतापर्यंत कोणतेच पाऊल उचललेले नसून पूर्वीसारखंच त्यांचे काम सुरू आहे. त्यानंतर त्यांना पक्षाने राजीनामा देण्यास सांगितले. प्रचंड यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्या गणेश शाह यांनी सांगितले, की मंत्र्यांना व्यक्तिगत पत्रे पाठवून राजीनामा देण्यास सांगितले आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत राजीनामा न दिलेल्या मंत्र्यावर कारवाईबाबत विचार करण्यात आला आहे. नेपाळमधील कायद्यानुसार, खासदाराने स्वतः पक्षातून राजीनामा दिल्यास किंवा त्यांना निष्कासित केल्यानंतर या दोन्ही स्थितीमध्ये संबंधित खासदाराचे सदस्यत्व रद्द होते. केपी शर्मा ओली सरकारमध्ये प्रचंड यांच्या पक्षाचे गृहमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशिवाय उद्योगमंत्री लेखाराज भट्टा, शहरविकासमंत्री प्रभू साह आणि श्रममंत्री गौरीशंकर चौधरी हे मंत्री आहेत. यांनी राजीनामा दिला आहे का नाही, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही.