काठमांडू – नेपाळच्या राजकारणामध्ये अनेक दिवसांपासून उलथापालथ होत असताना सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पार्टी विभाजनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. रविवारी एका गटाने पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना पक्षातून काढून टाकले. कारण नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते पुष्पकमल दहल प्रचंड आणि पंतप्रधान ओली यांच्यात अलिकडच्या काळात अनेक मुद्द्यांवर तीव्र मतभेद झाले आहेत.
एका राजकीय नेत्याने सांगितले की, पक्षाच्या नेतृत्वाने ओली यांच्या अलीकडील राजकीय हालचालीबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. परंतु यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यानंतर पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओली यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी डिसेंबरमध्ये प्रचंड यांच्या गटाने ओली यांना पक्षाध्यक्षपदावरून दूर केले. पक्षाचे दुसरे अध्यक्ष म्हणून माधव कुमार नेपाळ यांची निवड झाली आहे.
विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की, दोन दिवसांपूर्वी प्रचंड यांच्या गटाने काठमांडूमध्ये एक सरकारविरोधी रॅली काढली. रॅलीला संबोधित करताना प्रचंड यांनी संसद विघटनाला असंवैधानिक म्हटले. ओली यांच्या या निर्णयामुळे देशाच्या संघराज्य लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. सत्ता संघर्षादरम्यान ओलींनी संसद भंग केली होती. त्यानंतर देशातील राजकीय पेच आणखी तीव्र झाली आहे. आणि त्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.