काठमांडू – नेपाळमध्ये देशांतर्गत राजकारणात अनेक वाद सुरू असताना पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी आपल्या देशातील लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी भारतातील प्रदेशांवर आपला हक्क सांगितला आहे. तसेच, तो बळकावण्याचेही ते बरळले आहेत.
ओली म्हणाले की, कलापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या क्षेत्रातून भारताने माघार घ्यावी. त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे. कारण दोन्ही देशांमध्ये सीमा वादाबाबत परराष्ट्रमंत्री स्तरावरील चर्चा होणार आहे. चीनच्या तावडीत अडकलेल्या नेपाळी पंतप्रधानांनी राष्ट्रीय विधानसभेत आपल्या भाषणात भारताला चिथावणी देण्याचा हा प्रयत्न केला.
ओली पुढे म्हणाले की, या तिन्ही क्षेत्रात भारताची माघार ही परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली यांच्या अजेंड्यावर असून ते सीमेच्या वादावर चर्चेसाठी भारतात जात आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या निमंत्रणावरून ज्ञवाली हे १४ जानेवारी रोजी परराष्ट्रमंत्री स्तराच्या सहाव्या नेपाळ-भारत संयुक्त आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी भारतात येत आहेत. सुगौली करारानुसार कलापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख हे महाकाली नदीच्या पूर्वेस असून ते नेपाळचा भाग आहेत, असेही ओली यांनी स्पष्ट केले.
भारत-चीन युद्धानंतर जेव्हा भारतीय सैन्य दलांनी या भागात आपला तळ बनवण्यास सुरुवात केली, तेव्हा नेपाळी राज्यकर्त्यांनी हे क्षेत्र परत घेण्याचा प्रयत्न केला होता.