नवी दिल्ली – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे गुढ अद्याप उलगडलेले नाही आणि यासंदर्भात वेळोवेळी नवनवे खुलासे पुढे येत असतात. आता नेताजींचे नातू चंद्र कुमार बोस यांनी आपल्या आजोबांच्या गायब होण्यामागचे रहस्य जपानला माहिती असल्याचा दावा केला आहे.
त्या फाईल्समध्ये दडले आहे रहस्य
जपान सरकारकडे नेताजींच्या गायब होण्याच्या संदर्भात तीन महत्त्वपूर्ण फाईल्स आहेत. या फाईल्स अद्याप जपानने भारत सरकारकडे सोपविल्या नाहीत. त्या फाईल्स उघडल्यावर नेताजींच्या संदर्भातील रहस्य जगापुढे येणार आहे असा दावाही त्यांनी केला आहे. २४ आक्टोबर २०१५ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या कुटुंबाला आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. तिथे तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. चंद्र कुमार बोस सांगतात की, रुस, जपान, इंग्लंड यांच्यासह विविध देशांना पत्र लिहून नेताजींच्या संदर्भात त्यांच्याकडे असलेल्या फाईल्स मागविण्यात आल्याचे सुषमा स्वराज यांनी आम्हाला सांगितले होते. त्यानंतर जपान सरकारने त्यांच्याकडे पाच फाईल्स असल्याचे भारत सरकारला कळविले होते. जपानने त्यातील अद्याप दोनच फाईल भारताला दिल्या आहेत. त्यात फक्त नेताजींची काही छायाचित्रे आहेत. मात्र ज्या तीन फाईल्समध्ये महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्या अद्याप दिलेल्या नाहीत. त्या फाईल्स मिळाल्या तर नेताजींच्या संदर्भातील खोट्या कथांना पूर्णविराम लागेल, असे चंद्र कुमार यांचे म्हणणे आहे.
जपानकडे मागणी करा
नेताजी १९४२ ते १९४५ या कालावधीत अनेकदा जपानला गेले. जपानच्या इम्पेरियल आर्मीचे जनक हिदेकी तोजो यांच्यासोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या समाप्तीच्या वेळी जपानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री मामोरी शिगेमित्सु यांनीच नेताजींना हिरो आफ द एशिया ही उपाधी दिली होती, अशी माहिती चंद्र कुमार यांनी दिली. जपानसोबत भारताचे संबंध चांगलेच राहिले आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान सरकारसोबत उर्वरित तीन फाईल्सच्या बाबतीत चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डीएनए टेस्ट
जर्मनीत राहणाऱ्या नेताजींच्या कन्या अनिता बोस फाफ यांनी यासंदर्भात यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांना अनेकदा पत्र लिहीली आहेत, हे विशेष. चंद्र कुमार बोस यांनी जपानच्या टोकियो शहरात असलेल्या रेनको-जी मंदिरातील अवशेषांचे नेताजींच्या परिवारातील सदस्यांच्या डीएनएसोबत पडताळून बघण्याची मागणीही मोदींकडे केली आहे. त्यासाठी आपण डीएनए टेस्ट करायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.