(नेटरंग – तंत्रज्ञानाच्या नवनवीन घडामोडींची माहिती देणारे ‘अपडेट’ सदर)
मायक्रोसॉफ्ट वर्डमधील हे नवे फिचर माहित आहे का?
मंडळी, समजा तुम्ही कोणाची तरी मुलाखत घेत आहात. नंतर ती एखाद्या नियतकालिकाला प्रसिद्धीसाठी पाठवायची आहे. मुलाखत मोठी असेल तर एवढे सगळे लिहून काढायला खूप कंटाळा येतो. मुलाखतीपेक्षा जास्त वेळ लिहून काढण्यात जातो. आता हा कंटाळा करण्याचे काहीच कारण नाही. कारण वेबवरच्या मायक्रोसॉफ्ट वर्ड ने तुमच्यासाठी Transcribe हे नवीन फीचर आणले आहे. याद्वारे तुमच्या आधीच्या मुलाखतीचे अथवा Live मुलाखतीचे शब्दांकन अगदी सहजपणे होईल.
Transcribe इन वर्ड या नावाने ओळखले जाणारे हे नवीन वैशिष्ट्य मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऑनलाइन आवृत्तीत मिळेल. Azure Cognitive Services चा वापर त्यासाठी करण्यात आला आहे. सर्व मायक्रोसॉफ्ट 365 ग्राहकांना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे. सध्या नवीन मायक्रोसॉफ्ट एज किंवा क्रोम ब्राऊजर्समध्ये वेबसाठी मायक्रोसॉफ्ट वर्डद्वारेही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या वर्षाच्या अखेरीस अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालीवर आणण्याची मायक्रोसॉफ्टची योजना आहे. मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ऑनलाइन आवृत्तीत Dictate चिन्हाच्या शेजारी असलेल्या ड्रॉप-डाऊन बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्ही Transcribe पर्याय निवडून या सेवेचा वापर करू शकता. क्लिक केल्यावर काही पर्याय दिसतील. तुमची ऑडिओ file ही WAV आहे, MP4 आहे की MP3 फॉरमॅटमध्ये आहे ते विचारले जाईल. संबंधित file अपलोड केल्यावर वर्ड तुमच्यासाठी ट्रान्सक्रिप्ट म्हणजेचा आल्या भाषेत शब्दांकन करून देईल. सध्या अपलोड केलेल्या रेकॉर्डिंग्जसाठी, महिन्याला पाच तास किंवा ३०० मिनिटांची मर्यादा आहे- प्रत्येक अपलोड केलेल्या रेकॉर्डिंगचा आकार २००एमबीपर्यंत आहे.
शब्दांकन झाले की तो मजकूर कॉपी करून वर्ड मध्ये पेस्ट करा की काम झाले. इथे तुम्ही मुलाखतीचे शब्द कमीजास्त करू शकता. पत्रकार, विद्यार्थी आणि संशोधक याना हे वरदान ठरू शकेल.
- नेटकर्मी