नाशिक – नॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक चॅप्टरला `डेव्हिड डनलॉप आंतरराष्ट्रीय पुरस्काराने` सन्मानित करण्यात आले आहे. दरवर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर पर्यंत जगभरातल्या सगळ्या चॅप्टरनी वर्षभरात केलेल्या कार्यक्रमांच्या गुणवत्तेनुसार छाननी केली जाते व वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. २०१९ मध्ये नाशिक चॅप्टरने वर्षभर केलेल्या कामांची यादी पाठवल्या नुसार हा पुरस्कार मिळाला आहे. मागच्या वर्षी चॅप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी `अंतराळ तंत्रज्ञानांतील शैक्षणिक व व्यावसायिक संधी` या विषयावर एकूण ६४ ठिकाणी भाषणे व सादरीकरण भारतातील अनेक शहरांमध्ये, शाळा व महाविद्यालय तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये केले होते. या सर्व उपक्रमाची दखल हा पुरस्कार देतांना घेण्यात आली.
कोरोनामुळे अॅानलाईन पुरस्कार वितरण
दरवर्षी पुरस्कार वितरण सोहळा हा एनएसएसच्या `इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्स` कार्यक्रमात केला जातो. यावर्षी अमेरिकेच्या डलास शहरात हा सोहळा होणार होता. पण कोरोना मुळे सगळेच कार्यक्रम रद्द झाल्याने हे पुरस्कार वितरण इंटरनेटद्वारे ऑनलाईन कार्यक्रमात मागच्या आठवड्यात करण्यात आला.
अगोदरही मिळाले पुरस्कार
पूर्वीही २०१८ मध्ये एक्सलन्स ॲवॉर्ड व २०१९ मध्ये स्पेशल मेरीट अवॉर्ड फॉर वर्ल्ड वाईड कम्युनिकेशन हे पुरस्कार मिळाले होते. या वर्षी सलग तिसऱ्यांदा नाशिक चॅप्टरला पुरस्कार मिळाला आहे. अविनाश शिरोडे यांची एनएसएसच्या संचालक मंडळावर यावर्षी निवड झाली आहे. भारतातील व्यक्तीला प्रथमच हा सन्मान मिळाला आहे.
अशी आहे एनएसएस
एनएसएस ही एक स्वतंत्र, शैक्षणिक व ना-नफा कार्य करणारी संस्था आहे जी मानवतेच्या उन्नतीसाठी आणि पृथ्वीच्या पलीकडे अवकाशात इतर ग्रहांवर सभ्यतेच्या विस्तारासाठी व विपुल संसाधनांच्या शोध व वापरासाठी अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्राला समर्पित आहे. ही संस्था नासा आणि अमेरिकन सरकारला अंतराळ धोरणाबाबत सल्ला देते.