नाशिक – जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये विविध विषयांवर वेळोवेळी बैठका होत असतात व त्याचे कार्यवृत्त तातडीने तयार केले जाते. त्यामध्ये नमूद केलेल्या कार्यवाहीच्या मुद्द्यांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करून पुढच्या बैठकीच्या आधी सर्व मुद्द्यांची अंमलबजावणीसह पूर्तता होईल, याची काटेकोर दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या उपजिल्हाधिकारी तसेच कक्ष अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी निलेश श्रींगी, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, वासंती माळी, ज्योती कावरे यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सर्व महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेतला. इगतपुरी, घोटी येथे कचरा व्यवस्थापनातून स्रोत पुनर्प्राप्ती केंद्र (resource recovery centre) उभारणेसाठी सुयोग्य जागा उपलब्ध करून घेणेबाबत कार्यवाही करावी. आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन दाखले देण्यासंदर्भात जिल्हा स्तरावर कायमस्वरूपी वेब साईट सुरू करण्याबाबत माहिती घेण्यात यावी. तसेच खानपट्टे, जमिनी यांतून जास्तीत जास्त महसूल मिळणेसाठी आणि अवैध खनिकर्म रोखण्यासाठी योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सर्व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला तात्काळ उत्तरे देण्याबाबत अधिक प्रभावी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. तसेच सर्व अधिकाऱ्यांना कोरोनाच्या काळामध्ये स्वतःची, कार्यालयातील सदस्यांची काळजी घेत काम करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्या विभागाची माहिती यावेळी सादर केली.