नवी दिल्ली – वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली गेलेली नीट २०२० प्रवेश परीक्षा १३ सप्टेंबर रोजी पार पडली. परीक्षेचा निकाल ४५ दिवसात लावणे अपेक्षित असते. त्या अनुषंगाने १२ ऑक्टोबरच्या आधी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. १२ ऑक्टोबरपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे स्पष्ट करण्यात आले होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा परीक्षा उशिरा पार पडल्या. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास विलंब झाला आहे. दुसरीकडे, खाजगी कोचिंग क्लासच्या तज्ज्ञांच्या मते परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर केला जावा. शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास आधीच उशीर झाला असल्याने निकाल वेळेत लागल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. जर निकाल उशिरा जाहीर झाला तर पुढील प्रवेशास देखील विलंब होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १३ सप्टेंबरला देशभरातील विविध ठिकाणी नीट २०२० परीक्षा पार पडली. त्यानंतर परीक्षेची अन्सर की जाहीर करण्यात आली. त्यानंतर नोंदणीकृत १५.९७ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचप्रमाणे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावर्षीचा कट ऑफ पूर्वीपेक्षा जास्त असू शकेल. यावर्षी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची संख्या जास्त आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळाला होता. तसेच यावर्षी नीट परीक्षेचे प्रश्न पूर्वीपेक्षा सोपे होते. याउलट बर्याच तज्ञांचे मत असे आहे की यावर्षी साथीच्या रोगामुळे अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना पूर्वीसारखे वातावरण मिळाले नाही.