मुंबई – जेईई आणि नीट परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने व्हॉटसअॅप हेल्पलाईन सुरू केली आहे. परीक्षाकेंद्रापर्यंत पोहचण्यासाठी कोणतीही अडचण, समस्या असल्यास त्यांनी हेल्पलाईन क्रमांक ७२७७०९७९९९ वर व्हाट्सअप्प करावे त्यांच्यासाठी युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परीक्षार्थी आहेत. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेत पोहचण्याच्या अनुषंगाने मदतीची गरज भासू शकते, त्याकरिता हा सेवा उपक्रम करीत आहोत असे विक्रांत पाटील म्हणाले. आपले नाव, आपल्या जिल्ह्याचे नाव तसेच कोणत्या स्वरूपची समस्या आहे, याविषयी संक्षिप्त माहिती ७२७७०९७९९९ या क्रमांकावर व्हाट्सअप्प करायची आहे. गरजू विद्यार्थ्यांना वेळेत पोहचण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सहायता करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती विक्रांत पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असंही पाटील म्हणाले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने विक्रांत पाटील यांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्वरूपाची अडचण आल्यास हक्काने संपर्क करावा, युवा मोर्चाचे कार्यकर्ते मदतीसाठी तत्पर असतील, अशी माहिती विक्रांत पाटील यांनी दिली. मध्यप्रदेशच्या धर्तीवर नीट व जेईई परीक्षार्थींना मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी तसेच विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष बसेस सोडाव्यात, वाढीव व पर्यायी वाहतूक व्यवस्थेची तयारी करावी, अशी मागणी विक्रांत पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.