नवी दिल्ली – राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट २०२०)चा निकाल १६ ऑक्टोबरला घोषित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय टेस्ट एजन्सीला दिले आहेत. हा निकाल १२ ऑक्टोबर म्हणजे आज जाहीर होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे.
कंटेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षेला हजर राहता आले नाही अशा विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबरला परीक्षेस हजर राहण्याची संधी द्या, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे. १३ सप्टेंबर रोजी हजर राहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांना १४ ऑक्टोबर रोजी परीक्षा देण्याच्या निर्णयाला कोर्टाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
देशात १३ सप्टेंबर रोजी ३ हजार ८४३ परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात आली होती. पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र काही विद्यार्थी कोरोना आणि कन्टेन्मेंट झोनमध्ये अडकल्यामुळे परीक्षा देता आल्या नव्हत्या, अशा सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १४ ऑक्टोबर रोजी घेण्यात याव्या असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
nta.ac.in आणि ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि जन्मतारीख अचूक भरणे आवश्यक आहे.