पिंपळगाव बसवंत, ता. निफाड – सध्या बंद असलेले निफाड सहकारी साखर कारखाना (निसाका) व रानवड सहकारी साखर कारखाना (रासाका) चालू गळीत हंगामात सुरू करण्याबाबत बुधवारी (९ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता मुंबईत बैठक होणार आहे तशी माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली आहे.
बनकर यांनी सांगितले आहे की, अधिवेशनासाठी मुंबईत आलो असता संबंधित मंत्री महोदयांना ” निसाका, रासाका” सुरू करण्याबाबतचे पत्र सोबत घेऊन आलो. सदरचे कारखाने सुरू व्हावे याकरिता तत्काळ बैठक घ्यावी म्हणून मंत्री महोदयांना विनंती केली. त्यांनी तातडीने कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लि., काकासाहेब नगर (रानवड) व निफाड सहकारी साखर कारखाना लि., पिंपळस (भाऊसाहेब नगर) हे सहकारी साखर कारखाने कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत व स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंत या आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या संस्थांना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत बुधवारी सकाळी ९ वाजता मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.
या बैठकीला सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई, विश्वजीत कदम, आमदार बनकर, प्रधान सचिव (पणन), प्रधान सचिव (सहकार), सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे आदी उपस्थित राहणार आहेत.