नाशिक – तंत्रज्ञ ३ पदासाठी त्यांनी १० महिन्यापूर्वी स्पर्धा परीक्षा दिली. ते उत्तीर्णही झाले. निवड झाल्याचे त्यांना कळविण्यात आले. मात्र, अद्यापही ते नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. एकलहरे प्रकल्पग्रस्तांची ही व्यथा अखेर ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मांडण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पात गेल्या सहा महिन्यात एकही प्रकल्पग्रस्त कामगारांना कामावर घेण्यात आलेले नाही. या प्रशिक्षणार्थ्यांना लवकरात लवकर जॉईन करून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. एकलहरे प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना प्रकल्पामध्ये मानधनावर संधी दिली जाते. मात्र, गेल्या सहा महिन्यात एकाही प्रकल्पग्रस्ताला कामावर घेण्यात आलेले नाही. त्यांना तत्काळ कामावर बोलवावे. या पूर्वीच्या प्रशिक्षणार्थींची तंत्रज्ञ ३ या पदासाठी सरकारने १० महिन्यापूर्वी स्पर्धा परीक्षा घेतली होती. या स्पर्धा परीक्षेमध्ये एकलहरे प्रकल्पातील ३४ प्रशिक्षणार्थी यांची निवड झाली आहे. मात्र, अद्याप त्यांना सेवेमध्ये सामावून घेतलेले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
राहुरी येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री तनपुरे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब म्हस्के, प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत म्हस्के, प्रकल्पग्रस्त रामकृष्ण पाटील म्हस्के, ग्रामपंचायत सदस्य शांताराम म्हस्के, ग्रामपंचायत चंद्रभान म्हस्के आदी उपस्थित होते.