चेन्नई – तामिळनाडूमध्ये ६ एप्रिलला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्तारूढ अण्णाद्रमुकनं लोकांना आकर्षित करण्यासाठी जाहीरनामा घोषित केला आहे. ज्या कुटुंबात कोणालाही सरकारी नोकरी नाही, अशा कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
पक्षानं दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला सहा मोफत एलपीजी गॅस सिलिंडर, त्याशिवाय लोकांना मोफत घर, शेतकऱ्यांना ७,५०० रुपये वार्षिक मदत, सौर ऊर्जेवर चालणारा स्टोव्ह आणि वॉशिंग मशीन मोफत देण्याचं वचन या जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.
नागरिकता संशोधन कायद्यावर आश्वासन
नागरिकता संशोधन कायदा मागे घेण्याबाबत तसंच शिक्षणाला समवर्ती यादीतून काढून राज्याच्या यादीत समावेश करण्याचा आग्रह करणार असल्याचंही जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे. सत्तारूढ अण्णाद्रमुक भाजपसोबत निवडणूक लढवत आहे.
घरापर्यंत आवश्यक वस्तू पोहचवणार
निवडणुकीनंतर राज्यात सत्ता आल्यास जनवितरण प्रणाली राबवून आवश्यक वस्तूंच लाभार्थ्यांच्या घरापर्यंत वितरण करण्यात येईल, अशी घोषणा अण्णाद्रमुकनं केली आहे. विशेष म्हणजे शेजारी आंध्र प्रदेशमध्येसुद्धा अशाच प्रकारची योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रसूती रजा वाढवण्याचं आश्वासन
सरकारी महिला कर्मचार्यांसाठीची प्रसूती रजा नऊ महिन्यांवरून एक वर्ष करण्याचं तसंच दोन हजार अम्मा मिनी क्लिनिकसाठी नऊ इमारती बनवण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
मोफत घरे देणार
ज्या लोकांकडे स्वतःचं घर नाही, त्यांच्यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात अम्मा आवास योजनेअंतर्गत मोफत घरे बांधून देण्यात येणार आहेत. ज्या लोकांनी सहकारी आवास समित्यांकडून कर्ज घेतलं आहे, त्यांचे व्याजदरही माफ करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
शिधापत्रिकाधारकांना १५०० रुपये देणार
अण्णा द्रमुकचे वरिष्ठ नेते सी.पोन्नियन म्हणाले, की समाजात आर्थिक समानता आणण्यासाठी सर्व शिधापत्रिकाधारकांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. कुटुंबातील महिला प्रमुखाच्या बँक खात्यात हा निधी हस्तांतरित केला जाईल. शहरी भागात बसमध्ये प्रवास करणार्या महिलांना भाड्यामध्ये ५० टक्के सवलत दिली जाईल.