नवी दिल्ली – देशाला तशी तर बारा महिने निवडणुकांची सवय झाली आहे. मात्र कोरोना काळात वातावरण थंड होते. आता पुन्हा एकदा निवडणुकीचा मोसम आला आहे. अर्थातच यात इतर पक्षांच्या तुलनेत भाजप आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा सध्या विविध राज्यांच्या दौऱ्यावर आहेत.
राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या पुद्दुचेरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोर्चा वळवला आहे. तर अमित शहा आसाममध्ये पोहोचले आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजविण्यासाठी जे.पी. नड्डा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तामिळनाडू व पुद्दुचेरीमध्ये अनेक कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतील.
तसेच काही शिलान्यासही ते करतील. भाजपच्या जनसभेत त्यांचे भाषण होणार आहे. पंतप्रधानांचा दौरा अश्यावेळी होत आहे जेव्हा पुद्दुचेरी राजकीय संकटातून जात आहे आणि त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
यापूर्वी २०१८ मध्येही पंतप्रधान पुद्दुचेरीत गेले होते. पण यावेळी हा दौरा यासाठी महत्त्वाचा आहे कारण २०१६ पासून सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारला अलीकडेच पायउतार व्हावे लागले आहे.
अमित शहा आसाममध्ये
आसाममध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. शहा यांच्या दौऱ्यामुळे येथील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांचा लागोपाठ आसामचा दौरा होत असल्यामुळे राजकीय वातावरणही तापलेले आहे. यापूर्वीच्या दौऱ्यात त्यांनी रॅली काढून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता.
जे.पी. नड्डा बंगालमध्ये
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगालमध्ये निवडणूक घोषणापत्र तयार करण्याच्या एका अभियानाची सुरुवात करतील. तसेच एका जाहीर सभेतही त्यांचे भाषण होईल.