पटणा – बिहारच्या निवडणुकांमध्ये रामविलास पासवान नसणार अशी कल्पना कोणीच केली नव्हती. गेल्या ५१ वर्षांपासून बिहारच्या राजकारणात त्यांची चर्चा आहे. परंतु २०२० मध्ये प्रथमच त्यांच्याशिवाय निवडणुका होणार आहेत. यानंतर येणारी प्रत्येक निवडणूक त्यांच्या शिवाय होणार असल्याने बिहारच्या निवडणुकांत काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी ते नेहमीच सक्रिय असायचे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी त्यांनी मुलगा चिराग पासवान यांच्या खांद्यावर लोक जनशक्ती पक्षाची जबाबदारी दिली. याच पक्षाचे राम विलास पासवान हे स्थापनेपासूनच अध्यक्ष होते. वाढत्या वयामुळे त्यांना मंत्रालय आणि पक्षाचे एकत्र कामकाज चालविण्यात अडचण येत असल्याने त्यांनी पक्षाची धुरा मुलावर सोपवली. कोरोना काळात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. एलजेपीचे सर्वेसर्वा असलेल्या चिराग पासवान यांनी पक्षाचे नेते म्हणून निवडणुकीत प्रवेश केला आहे. नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) बरोबर न राहण्यावरून झालेल्या वादाच्या भोवऱ्यात निवडणुकांना वेगळी कलाटणी मिळणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे. रामविलास पासनाव यंदा नसल्याने बिहार निवडणुका कोणते वळण घेता याकडे सर्वांचे लक्ष आहे.