दिंडोरी – शहरातील पालखेड व निळवंडी रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड बनले आहे. सदर रस्त्याची बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या चार दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. दिंडोरी शहरातील पालखेड आणि निळवंडी रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती आहे. दिंडोरी चौफुली-निळवंडी रस्ता आणि दिंडोरी चौफुली पालखेड रस्ता हे अनुक्रमे दिंडोरी पंचायत समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व यांच्याकडे आहेत. मात्र, या स्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, वाहनधारकांची प्रचंड तारांबळ उडत आहे.
शहरातून जाणारा रस्ता काँक्रीटीकरण होणार होता. खासदार डॉ. भारती पवार यांनी गेल्यावर्षी पाहणी केली. त्यावेळी १५ दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अद्याप काम सुरू झालेले नाही. यामुळे दिंडोरीवासियांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.